पंढरपूर – कार्तिकी एकादशी पंढरपूर यात्रेदरम्यान विठुराया चरणी 4 कोटी 77 लाखांचे दान आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात 1 कोटी 56 लाखांनी वाढ झालेली आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
यावर्षी यात्राकाळात सुमारे 3 लाख 40 हजार भाविकांनी पांडूरंगाचे चरण दर्शन घेतले. तसेच 5 लाख 71 हजार भाविकांनी मुखदर्शन घेतले असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या देणगीत विठ्ठल चरणी 40 लाख 15 हजार 667 रुपये देणगी स्वरुपात प्राप्त झालेत. तसेच लाडूप्रसादाच्या माध्यमातून 62 लाख 49 हजार रुपये प्राप्त झालेत. भक्तनिवासातून 66 लाख 62 हजार 377 रुपये प्राप्त झालेत. सोन्या चांदीच्या भेटवस्तूंच्या माध्यमातून 8 लाख 36 हजार 254 देणगी मिळाली आहे. परिवार देवता आणि हुंडीपेटीतून 1 कोटी 57 लाख 21 हजार 527 रुपये मिळालेत. मोबाईल लॉकर आणि इतर जमेमधून 10 लाख 94 हजार 807 रुपये इत्यादींचा समावेश आहे.
दरम्यान, कार्तिकी सोहळ्यासाठी पंढपुरात जवळपास 7 लाख भाविक दाखल झाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. सोबतच, मंदिराला 700 वर्षापूर्वीचे पुरातन रूप देण्याच्या मंदिर विकास आराखड्याचा नारळ देखील फडणवीस यांच्या हस्ते फोडण्याची तयारी मंदिर प्रशासनाने केली होती.