युती सरकारच्या काळात शेतकरी उद्‌ध्वस्त

अजित पवार : अतुल बेनके यांच्या प्रचारार्थ ओतूर येथे सभा

ओतूर -शिवसेना-भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळात शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. आया-बहिणींवर अत्याचार वाढले, 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, बेकारी वाढली, कारखाने बंद पडले, चुकीच्या धोरणामुळे मंदी आली. जीएसटीमुळे व्यवसाय ठप्प होऊन व्यापारी अडचणीत आले, म्हणून सत्तेचा माज चढलेल्या शिवसेना-भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांची प्रचार सभा बुधवारी (दि.16) ओतूर येथे झाली. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी उमेदवार अतुल बेनके, माजी आमदार दिलीप ढमेढेरे, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, पांडुरंग पवार, मोहित ढमाले, अंकुश आमले, तुळशीराम भोईर, संतोष तांबे, नासीर मणीयार, जयप्रकाश डुंबरे, तुषार थोरात, दीपक औटी, जयानंद डुंबरे, बाजीराव ढोले, दशरथ पवार, तानाजी बेनके, रंगनाथ घोलप, उज्वला शेवाळे, राजश्री बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले की, शरद पवार यांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी 71 हजार कोटींची कर्जमाफी केली होती. उद्धव ठाकरे यांनी आता कर्जमुक्‍तीची घोषणा केली आहे. दहा रुपयांत जेवण देणार आहे म्हणे, मग पाच वर्षांत ही कामे करण्यास त्यांना कोणी रोखले होते का?, असा सवाल त्यांनी केला. आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर आपल्यासाठी जास्तीत जास्त निधी देऊ, सत्तेवर आल्यावर तीन महिन्यांतच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून महाराष्ट्र पुन्हा एक नंबरला आणणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी गणपत फुलवडे, दिलीप ढमढेरे, बाजार समितीचे सभापती संजय काळे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन बाजार समीतीचे संचालक संतोष तांबे यांनी केले.

अतुल बेनकेंच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
पुणे-नाशिक महामार्गाचे काम करणाऱ्या एका बड्या कंपनीला मुरूम उचल्याप्रकरणी कोट्यवधींचा दंड शासनामार्फत झाला होता. पण लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात मध्यस्थी करून तो दंड नाममात्र आठ लाख रुपयांवर करण्यास भाग पाडले. आणि या बदल्यात जिल्हा परिषद गटातील रस्त्यांची कामे एका रात्रीत कंपनीकडून फुकट करून घेतली. परंतु विषय इथेच संपला नाही. कालांतराने, त्याच रस्त्यावर शासकीय निधी टाकून संपूर्ण पैसे हडप केले, असा गौप्यस्फोट उमेदवार अतुल बेनके यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.