जामखेड – तालुक्यातील एका गावातील 22 वर्षीय मतिमंद मुलीवर पुण्यातील शिरुर येथे गेल्या तीन महिन्यांपासून एकाजणाने अत्याचार केला. यामुळे सदर मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडित मतिमंद मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जामखेड पोलिसांनी सदरचा गुन्हा शिरुर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडित मतिमंद मुलगी तिच्या आजोबांच्या गावी राहत होती. याच दरम्यान या मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने मे 2019 ते 25 ऑगस्ट 2019 पर्यंत या तीन महिन्यांच्या कालावधीत या मतिमंद मुलीवर बलात्कार केला. यानंतर सदर मतिमंद मुलगी ही अकरा आठवड्यांची गर्भवती राहीली.
सदर मुलगी ही मतिमंद असल्याने हा प्रकार लवकर लक्षात आला नाही. मात्र पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी सोमवारी (दि. 14) रोजी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून या अज्ञात व्यक्ती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि निलेश कांबळे हे करत आहेत.