जामखेड – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. प्रशिक्षण सत्राला तब्बल 156 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दांडी मारली असून, प्रांताधिकारी या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार, 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.
निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशिक्षण देणे अनिवार्य असते. एकीकडे उमेदवारी अर्जांचे वितरण आणि स्वीकृतीला सुरुवात झाली असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्षांसाठी आज कर्जत येथे दोन सत्रांत प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणास एक हजार 852 कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी एक हजार 696 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला हजेरी लावली. तसेच 156 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मात्र या प्रशिक्षण वर्गाकडे पाठ फिरविली आहे.