नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील दोषींच्या फाशीच्या शिक्षेसाठी तिहार कारागृहामध्ये आज “डमी एक्झिक्युशन’ घेन्यात आले. दिल्लीतील न्यायालयाने या प्रकरणातील मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह या चारही दोषींना 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता फाशी देण्याचे आदेश दिले आहेत.
त्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी तुरुंग अधिकाऱ्यांनी आज फाशी देण्याची रंगीत तालिम घेण्यात आली. त्यासाठी कैद्यांच्या वजनाप्रमाणे दगड, विटांनी भरलेली पोती वापरण्यात आली, असे तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दोषींना तुरुंग क्रमांक 3 मध्ये फाशी दिले जाणार आहे. या फाशीसाठी मीरतवरून पवन या जल्लादाला तिहार कारागृहामध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी तिहारच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासनाला पत्र पाठवून दोन जल्लाद उपलब्ध करून देण्याची मागणीही केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चारही दोषींना एकापाठोपाठ एक करून फाशी दिले जाणार आहे. चारही दोषींची मानसिक स्थिती तपासली जात आहे. त्यासाठी त्यांच्याशी तुरुंग अधिकारी दररोज संवाद साधत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.