नवी दिल्ली – दोन दहशतवाद्यांना आपल्या गाडीतून नेणाऱ्या दविंदरसिंग नावाच्या एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. या अधिकाऱ्याचा संसदेवर सन 2001 साली झालेला हल्ला आणि पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याशी संबंध आहे काय असा प्रश्न उपस्थित करीत कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
दविंदर सिंग हा मिरबाजार भागात डीएसपी म्हणून नेमणुकीला आहे. हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना आपल्या गाडीतून नेताना दविंदरसिंगला रविवारी अटक करण्यात आली आहे. हा अधिकारी नेमका कोण आहे?, त्याचा 2001 च्या संसद हल्ल्याशी काय संबंध आहे, त्याचाच पुलवामा हल्ल्याशी संबंध आहे काय? तो स्वताच्याच गाडीतून दहशतवाद्यांची ने आण कोणाच्या सांगण्यावरून करीत होता, या मागे मोठे कटकारस्थान आहे काय असे प्रश्न सुर्जेवाला यांनी उपस्थित केले आहेत. दविंदरसिंग याला याच महिन्यात पोलिस अधिक्षक म्हणून बढती मिळणार होती. त्याच्या आतच तो या प्रकारात पकडला गेला आहे.
सन 2001 साली संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात त्याचेही नाव चर्चेत आले होते. या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू यानेही त्याचे नाव घेतले होते. पण नंतरच्या चौकशीत दविंदरसिंग निर्दोष सुटला होता.