Raghav Chadha – आम आदमी पक्षाने संजय सिंह यांच्या जागी खासदार राघव चढ्ढा यांची राज्यसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे, अशी माहिती पक्ष सूत्रांनी दिली. राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात, आप पक्षाच्या नेतृत्वाने म्हटले आहे की संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत, राघव चढ्ढा हे यापुढे वरच्या सभागृहात पक्षाचे नेते असतील.
आपचे खासदार संजय सिंह सध्या दिल्ली दारू धोरण प्रकरणी तुरुंगात आहेत. चढ्ढा हे राज्यसभेच्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहेत. ‘आप’चे सध्या वरिष्ठ सभागृहात एकूण 10 खासदार आहेत.भाजप, काँग्रेस आणि टीएमसीनंतर राज्यसभेत आपचे संख्याबळ चौथ्या क्रमांकावर आहे. राघव चढ्ढा हे अभ्यासक खासदार म्हणून प्रख्यात आहेत.
त्यांनी अलिकडेच अर्थसंकल्प आणि देशातील अर्थकारणावर राज्यसभेत पक्षाची बाजू मांडताना अत्यंत प्रभावी वक्तव्य केले आहे. याच आठवड्यात राज्यसभेत निवडणूक आयोगाशी संबंधीत एक विधेयक मांडण्यात आले होते, त्यातील तरतूदींच्या अनुषंगाने त्यांनी सरकारच्या हेतूवर जोरदार टीका करीत त्यांना धारेवर धरण्याचे काम केले होते.