आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना विजय व पराभवापेक्षा एका गोष्टीमुळे गाजला. ती गोष्ट म्हणजे चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या खेळीमुळे व त्याच्या हुशारी म्हणा किंवा धूर्तपणामुळे.
धोनीने फलंदाजीत दाखवून दिले की त्याला बेस्ट फिनिशर का म्हणतात. पण जे त्याने मुंबईची फलंदाजी सुरू असताना कॅरन पोलार्डला बाद करण्यासाठी जे जाळे टाकले तेच त्याच्या क्रिकेटिंग ब्रेनचे यश आहे. 2010 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेतील मुंबईविरुद्धच्या सामन्यात धोनीने लावलेल्या जाळ्यात पोलार्ड अडकला होता व लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याच्या प्रयत्नात तो लॉंग ऑफला सरळ ठेवलेल्या क्षेत्ररक्षकाकडे झेल देऊन बाद झाला होता. तोच ट्रॅप शुक्रवारी झालेल्या सामन्यातही धोनीने लावला व पोलार्डही अगदी अलगद त्या जाळ्यात अडकला.
पोलार्ड फलंदाजीला आल्यावर त्याला बाद करण्यासाठी धोनीने शिवम दुबेला स्ट्रेट ड्राइव्हच्या प्रयत्नात पोलार्ड बाद व्हावा यासाठी साइट स्क्रीनसमोर उभे केले. पोलार्ड अनेकवेळा असाच सरळ फटका मारताना बाद झाला आहे. महेश तिक्षणाने टाकलेल्या डावातील 17 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पोलार्डने दुबे उभा असलेल्याच ठिकाणी फटका मारला व सहज त्याच्या हातात झेल देत बाद झाला. धोनीच्या याच हुशारीचे आता अन्य खेळाडूंनाही आश्चर्य वाटत आहे, की धोनीने हे कसे केले. मात्र, या निर्णयामागे त्याचा प्रत्येक फलंदाजाचा असलेला अभ्यास व पूर्वानुभव आहे हेच सिद्ध झाले. म्हणूनच धोनीला भारताचा सर्वोत्तम फिनिशर व हुशार तसेच धूर्त कर्णधार मानले जाते.
तब्बल 12 वर्षांपूर्वी 2010 साली पोलार्डसाठी लावलेला ट्रॅप यावेळीही त्याने यशस्वी करून दाखवला हेच धोनीचे महानपण आहे. 2019 साली इंग्लंडला झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर त्याने ब्रेक घेतला, तसेच काही महिन्यांतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली व पुढील किमान काही वर्षे आयपीएल खेळत राहणार हेदेखील सांगितले. यंदाचा मोसम सुरू होण्यापूर्वीच त्याने चेन्नई संघाचे कर्णधारपदही सोडले व ही जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवली.
आता त्याला केवळ खेळाचा आनंद लुटायचा आहे हे तर स्पष्टच आहे. मात्र, यंदाच्या स्पर्धेत चेन्नईचा प्रत्येक सामना पाहिला की कर्णधार जडेजा आहे, की धोनी हाच प्रश्न पडतो. जडेजावर केवळ कॅमेरा फिरतो निर्णय मात्र धोनीच घेताना दिसतो. धोनीची हीच हुशारी किंवा धूर्तपणा यापुढील सामन्यांतच नव्हे, तर पात्र ठरल्यावर प्लेऑफमध्येही दिसावा हीच अपेक्षा आहे.