संविधानामुळे समतेचे राज्य आले – फडणवीस

लोणावळ्यात 42 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

लोणावळा   – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे देशात समतेचे राज्य आले. व्यक्ती हा जन्माने नव्हे, तर कर्माने मोठा आहे, ही आपली संकल्पना राबविणार आपले संविधान सर्वांना समान अधिकार देते, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोणावळा येथे केले.

लोणावळा शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून लोणावळा नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात 2 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच 32 कोटी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र व 8 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली शहरातील कैलास स्मशानभूमी अशा एकूण सुमारे 42 कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार प्रमोद जठार, उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी, राजू बच्चे, देविदास कडू, सुधीर शिर्के, संजय घोणे, सुनील इंगुळकर, निखिल कवीश्‍वर, ललित सिसोदिया, नितीन आगरवाल, नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, मंदा सोनवणे, जयश्री आहेर, गौरी मावकर, पूजा गायकवाड, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, “आरपीआय’चे शहराध्यक्ष कमलशील म्हस्के आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि त्यांच्या सर्व टीमचे कौतुक करताना निसर्गाने जे दिलंय ते टिकवून पर्यटन वाढीसाठी आवश्‍यक अधिक विकास काम कसे करता येईल, यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असते आणि ते माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरेखा जाधव यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा नगरपरिषदेने करून दाखवले, असे सांगत नगरपरिषदेने निधीतून मिळालेल्या पैशाचा योग्य चांगला उपयोग शहराच्या विकासासाठी केल्याचे प्रतिपादन केले.

शासनाच्या माध्यमातून दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य खंड रुपात आणि सवलतीच्या दरात प्रसिद्ध करण्यात येते, मात्र शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या आघाडी सरकारने हे प्रकाशन बंद केल्याची खंत व्यक्‍त करीत फडणवीस यांनी याबाबत आपण उच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाकडून सरकारला सुमोटो नोटीस देण्यात आल्याचे सांगितले.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी यावेळी बोलताना फडणवीस हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असून, त्यांच्या कारकिर्दीत लोणावळा शहराला 100 कोटीपेक्षा अधिक निधी दिल्याने शहराचा चौफेर विकास झाला असल्याचे सांगितले. माजीमंत्री बाळा भेगडे यांनी लोणावळा शहराला पर्यटनाची नवी ओळख मिळवून देण्यासाठी फडणवीस यांनी केंद्रात प्रयत्न करावे, अशी विनंती केली.

“स्मशानभूमीचे उद्‌घाटन करायला भीती वाटते’
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोणावळा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण केले. यावेळी येथील असलेल्या स्मशानभूमीचे देखील उद्‌घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मधील स्मशानभूमीचा किस्सा सांगितला. मला स्मशानभूमीचे उद्‌घाटन करायला भीती वाटते. नागपूरला महापौर असताना स्मशानभूमीच्या उद्‌घाटनाला मला बोलविण्यात आले होते. त्यावेळी एक “डेड बॉडी’ आणून त्याला अग्नी माझ्या हस्ते देण्यात आली होता. त्यामुळे मला स्मशानभूमीचे उद्‌घाटन करायला भीती वाटत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र लोणावळ्यात स्मशानभूमीचे उद्‌घाटन करताना असे काही केले गेले नाही. त्यामुळे बरे वाटल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.