उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे

देहू नगरपंचायत : निवडणूक निर्णय अधिकारी संजय असवले यांचे आवाहन

देहूगाव -देहूगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, नगरपंचायत कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू आहे. इच्छुक उमेदवारांनी आचार संहितेचे पालन करावे.

नामनिर्देशन पत्र दाखल करणे, छाननी, उमेदवारीमागे घेणे, चिन्ह वाटप, निवडणूक प्रचार, मतदान प्रक्रिया, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याबाबतची माहिती पत्रकार परिषदेमध्ये प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय असवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हवेली तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रशांत ढमाले, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्यासह मंडलाधिकारी शेखर शिंदे, तलाठी अतुल गीते आदी यावेळी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाकडून नामनिर्देश पत्र भरण्यासाठी वेबसाईट उपलब्ध केली. दि. 1 ते 7 डिसेंबर 2021 (स. 11 ते दुपारी 3 पर्यंत) या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. 4 व 5 डिसेंबर 2021 सुट्‌टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.

8 डिसेंबर 2021 नामनिर्देशनपत्रांची छाननी सकाळी 11 वाजता होईल. त्याचदिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 13 डिसेंबर दुपारी 3 वाजण्यापूर्वी नामनिर्देशपत्र मागे घेण्याची मुदत असणार आहे. अपिल असल्यास 13 ते 16 डिसेंबरपर्यंत अपिलांचे निर्णयानंतर 16 डिसेंबर रोजी चिन्ह वाटप होईल.

आचारसंहिता पथक तयार करण्यात आले असून, पथक प्रमुख नायब तहसीलदार असणार आहेत. भरारी पथक नेमण्यात आले असून, पोलीस पथकासह चित्रीकरण सर्व्हे होणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या ना-हरकत प्रमाणपत्र, परवानग्या व कागदपत्रा संदर्भात एक खिडकी योजना सुरू आहे. मतदानासाठी प्रभागनिहाय 33 मतदान केंद्र असणार आहेत. पाच विभागात अधिकारी (केंद्र प्रमुख) यासह निवडणूक कामकाजासाठी 160 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांचे प्रशिक्षण 9 रोजी सकाळी 11 वाजता व दुसरे प्रशिक्षण 16 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता संत कृपा मंगल कार्यालय येथे होणार आहे.

21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान केंद्रावर मतदान होणार असून, 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता भक्‍त निवास येथील कार्यालयामध्ये मतमोजणी होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.