पुणे – सध्या सुट्यांच्या हंगामामुळे पुणे रेल्वे स्थानकावर गर्दीचा उच्चांक अनुभवण्यास मिळत आहे. त्यातच प्लॅटफॉर्म क्र. 6 येथून क्र. 1 येथे जाण्यासाठी एकच मार्ग उपलब्ध असल्याने जीवघेण्या कोंडीत अडकून प्रवाशांची घुसमट होत आहे.
सध्या उन्हाळी सुट्या सुरू झाल्या आहेत. त्यात जोडून आलेल्या सुट्यांमुळे पुणे स्टेशन येथे येणाऱ्या आणि येथून अन्य गावांना जाणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. ते पाहता रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. पण, असा कोणताही प्रकार येथे दिसून येत नाही. विशेषत: सायंकाळच्या सुमारास ही वर्दळ वाढत असून, ट्रेनमधून उतरल्यानंतर पुढे मार्गस्थ होण्यासाठी प्रवाशांना अलोट गर्दीत थांबून राहावे लागत आहे. त्यात बालके आणि वृद्ध प्रवाशांना या कोंडीचा त्रास होत आहे.
पुणे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म क्र. 6 येथून डी.आर.एम. बाजूने जाण्यासाठी एक आणि प्लॅटफॉर्म क्र. 1 येथे जाण्यासाठी दुसरा मार्ग आहे. तोच मार्ग पार्सल ऑफिसकडेही जातो. शिवाय, अन्य प्लॅटफॉर्मप्रमाणे येथे ईलिव्हेटरची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे एकाच ठिकाणच्या पायऱ्यांवर प्रवाशांचा भार वाढत आहे. विशेष म्हणजे, गर्दीच्या वेळेत रेल्वे पोलीस येथे तैनात दिसून येत नाहीत. त्यामुळे पायऱ्यांवर जाण्यासाठी आणि तेथून उतरण्यासाठी प्रवाशांना निष्कारण थांबावे लागत आहे. प्रवाशांची वर्दळ आणि भविष्यातील वाढता ताण लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्र. 6 येथे आणखी एक मार्ग उभारण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
वाहतूक कोंडीची डोकेदुखी
पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान नसल्यामुळे रेल्वे स्थानकात रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शाळा आणि कॉलेजला नुकत्याच उन्हाळी सुटी लागल्यामुळे नागरिक पर्यटन आणि गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दी करत आहेत. स्थानकात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. स्थानकात प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी चार लेन आहेत. एक लेन पीएमपी बससाठी राखीव आहे. तर इतर तीन लेनमधून खासगी वाहने, रिक्षा आणि ओला, उबेर वाहने जातात. या तीनही लेनमध्ये बेशिस्त रिक्षाचालक आणि खासगी वाहनचालकांनी मुख्य प्रवेशाद्वारावरच वाहने उभी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.