पुणे – शहराच्या मेट्रो स्थानकांच्या उभारणीत आढळलेल्या त्रुटी शोधण्यात येतील आणि मेट्रोचे पुन्हा एकदा अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांच्या समितीद्वारे परीक्षण करून अहवाल मेट्रोच्या प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने रविवारी स्पष्ट केले.
सीओईपीने केलेल्या मेट्रोच्या स्ट्रक्चरल ऑडीट संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. स्ट्रक्चरल ऑडिटवरून निर्माण झालेल्या संभ्रमावरून अखेर रविवारी सीओईपीच्या कुलसचिवांनी निवेदनाद्वारे विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली. पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालय, नळस्टॉप, आनंदनगर आणि वनाज या स्थानकांच्या कामात अनेक त्रुटी असल्याची बाब समोर आली होती. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात पुणे मेट्रोमध्ये काही ठिकाणी कौशल्यासंबंधी त्रुटी आढळल्याचे दिसून आले. त्यानंतर सीओईपीने केलेल्या मेट्रोच्या स्ट्रक्चरल ऑडिटवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
या पार्श्वभूमीवर सीओईपीच्या कार्यालयाकडून रविवारी अधिकृतरीत्या निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. सर्वसामान्यांच्या दृष्टीने वाहतुकीचा प्रश्न ज्वलंत आहे. त्यामुळे मेट्रो हा शहराच्या विकासाला गती प्राप्त करून देणारा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वतीने डॉ. ईश्वर सोनार यांनी त्रयस्थ परीक्षणाचे काम स्विकारून प्राथमिक अहवाल सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. या अहवालातील तांत्रिक बाबींसंदर्भात विविध माध्यमातून निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. त्याची दखल घेतली असून, पुन्हा मेट्रोच परीक्षण करून अंतिम विस्तृत्व अहवाल सादर केला जाईल. त्याचबरोबर काम स्वीकारल्यापासून प्राथमिक अहवाल सादर करण्यापर्यंतच्या प्रक्रियेमधील त्रुटींचा शोध घेण्यासाठी विद्यापीठाने पावले उचलली आहेत.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ हे स्वत:ची प्रतिष्ठा व समाजमान्यता जपत अशा घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कटिबद्ध आहे. समाजास उपयुक्त सेवा देण्यास बांधील आहे.
– डॉ. मुकुल सुतवणे, कुलसचिव, सीईओपी