पुणे, दि. 6 -अनधिकृत बांधकामांना लगाम घालण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ड्रोनच्या साह्याने जीआयएस आणि इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट (आयआरएसएस) या तंत्रज्ञानाचा वापर करून अनधिकृत बांधकामांवर “वॉच’ ठेवला जाणार आहे. त्यामुळे वेळेवरच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे सोपे होणार आहे.
“पीएमआरडीए’च्या हद्दीत सुमारे 700 गावांचा समावेश होतो. एवढ्या मोठ्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे शोधणे अवघड आहे. शहरालगतच्या गावांमध्ये तसेच जेथे नागरीकरण वेगाने होत आहे, अशा गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहात आहेत. नुकताच “पीएमआरडीए’ने प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रस्तावित रहिवास झोन आहे, त्या ठिकाणीसुद्धा अनधिकृत बांधकामे सुरू आहेत, या सर्वांवर लक्ष ठेवणे अवघड असल्याने “पीएमआरडीए’ने ड्रोनचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रणालीचा अवलंब करण्यासाठी “पीएमआरडीए’ने दोन स्वतंत्र ड्रोन खरेदी केले असून, “जीआयएस’ आणि “आयआरएसएस’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अभियंते, कर्मचाऱ्यांचा एक विभाग गेल्या काही दिवसांपासून कार्यरत करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी या “जीआयएस’ प्रणालीचा अवलंब करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. “पीएमआरडीए’च्या हद्दीत परवानगी न घेता उभारलेल्या बेकायदा बांधकामांबाबत गुगल नकाशाच्या उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे जुने आणि नवीन नकाशे प्राप्त करण्यात आले आहेत. 100 ठिकाणे निश्चित करून माहिती देण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली असता, बेकायदा बांधकामे उभारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. अशा बांधकामांना नोटीस देऊन कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.