पुणे, दि. 6 -दोन वर्षांची मरगळ जाऊन, सोने खरेदीला यंदा दसऱ्यात झळाळी आली. त्यामुळे सराफांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी चांगली जाणार, याची ही झलक असल्याची भावना सराफांनी व्यक्त केली आहे. दोन वर्षांत करोनाने लोकांच्या आरोग्याबरोबरच आर्थिक कंबरडेही मोडले. त्यामुळे गरजेच्या आणि जीवनावश्यक वस्तूंशिवाय नागरिकांनी उपभोगाच्या वस्तूंची खरेदी केली नाही. मात्र अस्थिरतेचे मळभ जाऊन नागरिकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर मुक्तहस्ते सोने-चांदीच्या वस्तूंची खरेदी केली. त्यामुळे सराफ बाजार यंदा 35 टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळाले.
साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाच्या असलेल्या दसऱ्याची खरेदी ही दिवाळीच्या खरेदीचा ट्रेंड ठरवते. त्यामुळे यंदाची दिवाळीही चांगली जाणार असून, सराफ बाजारात आनंदाचे वातावरण असल्याचे “सराफ असोसिएशन’चे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले.
सराफ अतुल अष्टेकर ः नवरात्रीच्या आधीपासून लोकांनी दागिन्यांच्या बुकींगला सुरुवात केली होती. पितृपंधरवड्यात सोन्या-चांदीचे भाव कमी झाले होते. सुमारे 1500 रुपयांनी आजच्यापेक्षा ते कमी होते. त्यावेळी अनेकांनी मुहूर्ताची खरेदी करून ठेवली होती. (म्हणजे ऑर्डर दिली होती) गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बुकींगचे प्रमाण जास्त होते. लोकांचे ऐनवेळी खरेदीचे प्रमाणही जास्त होते. मुहूर्तावर खरेदीचा कलही जास्तच होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याचा भाव जास्त असला तरी मुहूर्ताची खरेदी म्हणजे वेढणीची खरेदीही भरपूर झाली. नेकलेस, चेन, छोटे मंगळसूत्र, टॉप्स, अंगठ्या यालाही गर्दी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 35 टक्क्यांनी खरेदीत वाढ दिसून आली.
सराफ अजित गाडगीळ ः दोन वर्षे करोना असल्यामुळे खरेदी नव्हती. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. सोन्याचे व चांदीचे भाव कमी होते. दोन्हीला मागणी जास्त होती. बुकींग आधी केलेले असते, ऑर्डरही देऊन ठेवल्या होत्या. सराफांकडे दसऱ्याच्या आधीपासूनच दिवाळीची तयारी असतेच. छोट्या गावातूनही यंदा चांगला प्रतिसाद होता. दिवाळी चांगली जाणार, असे यावरून दिसते.
सराफ सौरभ गाडगीळ (व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी) ः बाजारात चांगलीच गर्दी आहे. ग्राहक नवरात्रीपासून खरेदी करत आहेत. ग्राहकांची दोन वर्षे “वेट अँड वॉच’ पॉलिसी होती. लोकांमध्ये आता आत्मविश्वास आला आहे. यंदा मोठ्या दागिन्यांना मागणी होती. गळ्यातले, बांगड्या, हिऱ्यांचे दागिने या सगळ्यांना मोठी मागणी होती. आता सोन्या-चांदीच्या वस्तूंची “रेग्युलर’ खरेदी सुरू झाली आहे. याचे कारण निर्माण झालेली अनिश्चितता दूर झाली आहे. त्यामुळे राखून ठेवलेल्या पैशांची अशा प्रकारे गुंतवणूक सुरू केली आहे, असे म्हणता येईल. मार्केटमध्ये “मॅच्युरिटी’ आलेली दिसते. मात्र यावर्षी ग्राहकांचा “डिस्काऊंट’वर भर नव्हता, तर चांगल्या डिझाइन्स, चांगले कलेक्शन्स, बाय बॅक पॉलिसी, वॉरंटी वगैरेवर भर होता.