जयपूर -अभिषेक शर्माचे अर्धशतक व राहुल त्रिपाठीची जिद्दी खेळी व त्यानंतर ग्लेन फिलिप व अब्दुल समदच्या अविश्वसनीय फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने रविवारी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा 4 गडी राखून पराभव केला. अखेरच्या षटकात घडलेले नाट्य सामन्याला कलाटणी देणारे ठरले.
संदीप शर्माने टाकलेल्या या षटकात अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती. समदने मारलेला फटका जोस बटलरने झेलला. मात्र हा चेंडू नो-बॉल होता. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर 4 धावा असे गणित तयार झाले. समदने या चेंडूवर षटकार खेचला व एक अशक्यप्राय विजय मिळवला.
विजयासाठी 215 धावांचा पाठलाग करताना अनमोलप्रीत सिंग व अभिषेक शर्मा यांनी अर्धशतकी सलामी दिली. अनमोलप्रीत 33 धावांवर बाद झाल्यावर शर्माने त्रिपाठीसह डाव सावरताना विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. शर्मा 55 धावांवर परतला. त्यानंतरही हेनरीच क्लासेन व त्रिपाठीने आक्रमक फटकेबाजी करत सामना आवाक्यात आणला होता. मात्र, क्लासेन 26 तर, त्रिपाठी 47 धावांवर बाद झाला. पाठोपाठ एडन मार्करमनेही निराशा केली. मात्र, ग्लेन फिलिप्सने कुलदीप यादव (ज्युनियर) याने टाकलेल्या डावातील 19 व्या षटकात 3 षटकार व 1 चौकार अशी फटकेबाजी केली व सामना हैदराबादच्या आवाक्यात आणला. तो याच षटकात 7 चेंडूत 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर अब्दुल समदने 7 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 17 धावा करत हैदराबादला सामना जिंकून दिला.
तत्पूर्वी, जोस बटलर व कर्णधार संजू सॅमसन यांच्यासह यशस्वी जयस्वालने केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादसमोर 215 धावा करण्याचे लक्ष्य ठेवले. वादळी फलंदाजी केलेल्या बटलरचे शतक मात्र अवघ्या 5 धावांनी हुकले.
राजस्थानचा कर्णधार सॅमसनने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर बटलरने जयस्वालसह अर्धशतकी सलामी दिली. अफलातून फलंदाजी करत असलेला जयस्वाल अनावश्यक फटका मारताना बाद झाला. त्याने 18 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांसह 35 धावांची खेळी केली. त्यानंतर बटलरने कर्णधार सॅमसनसह शतकी भागीदारी केली. बटलरने अर्धशतक पूर्ण केल्यावर त्याच थाटात शतकाकडे कूच केली. मात्र, तो 95 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 59 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. दरम्यान सॅमसननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानेही आक्रमक फलंदाजी करताना नाबाद 66 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 38 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 5 षटकार फटकावले. शेमरन हेटमायरने नाबाद 7 धावा केल्या. या जोडीने संघाला 20 षटकांत केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात 214 धावांची मजल मारून दिली. राजस्थान रॉयल्सने यंदाच्या लिलावात इंग्लंडच्या ज्यो रुटला आपल्या ताफ्यात घेतले होते. मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळत नव्हती. मात्र, रविवारच्या लढतीसाठी त्याला संघात स्थान मिळाले.
विक्रमवीर यशस्वी
आयपीएलच्या इतिहासात भारताकडून सर्वात कमी वयात 1000 धावा पूर्ण करत राजस्थानच्या यशस्वी जयस्वालने नवा विक्रम आपल्या नावावर केला. अशी कामगिरी करणारा जयस्वाल ऋषभ पंतनंतरचा भारताचा दुसराच खेळाडू ठरला आहे. त्याने 21 वर्षे आणि 130 दिवस वय असताना आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या. पंतने 20 वर्षे 218 दिवस वय असताना 1000 धावा केल्या होत्या. मात्र पंतने जयस्वालपेक्षा 1 डाव जास्त खेळला आहे.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 2 बाद 214 धावा. (यशस्वी जयस्वाल 35, जोस बटलर 95, संजू सॅमसन नाबाद 66, शेमरन हेटमायर नाबाद 7, मार्को जेन्सन 1-44, भुवनेश्वर कुमार 1-44). सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 6 बाद 217 धावा. (अभिषेक शर्मा 55, राहुल त्रिपाठी 47, अनमोलप्रीत सिंग 33, हेनरीच क्लासेन 26, ग्लेन फिलिप 25, अब्दुल समद नाबाद 17, मार्को जेन्सन नाबाद 3, यजुवेंद्र चहल 4-29).
लक्षवेधी
जयस्वालची तुफानी फलंदाजी; मात्र, स्थिरावल्यावरही बाद
बटलरचे शतक हुकले
सॅमसनची अर्धशतकी खेळी
कुलदीप यादव (ज्युनियर) याच्या षटकात सामना फिरला