अहमदाबाद : आयपीएल 2023 मधील अंतिम सामना आज चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने गुजरातचा 5 विकेट्सने पराभव करून पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.या विजयासह चेेन्नईने सर्वाधिक वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासोबत बरोबरी केली आहे.
दरम्यान, राखीव दिवशीही फायनलमध्ये पावसाने कहर केला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 बाद 214 धावा केल्या. त्यानंतर विजयासाठी 215 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने 0.3 षटकात बिनबाद 4 धावा केल्या असता पावसामुळे सामना थांबवण्यात आला. त्यानंतर पावसामुळे जवळपास तीन तासांचा खेळ वाया गेला.
पंचांनी दोन ते तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. 12.10 वाजता सामन्याला सुरुवात झाली. पण डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला नवीन टार्गेट देण्यात आले. डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे आव्हान देण्यात आले.
विजयासाठीचे 171 धावांचे आव्हान चेन्नईने 15 षटकांत 5 विकेट गमावत पूर्ण केले. जडेजाने शेवटच्या षटकात कमाल खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन चेंडूत 10 धावांची गरज असताना जडेजाने एक षटकार ठोकला आणि त्यानंतर चौकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला.
चेन्नईकडून डेवॉन कॉनवे याने 25 चेंडूत सर्वाधिक 47 धावा केल्या.तर सलामीवीर ऋुतुराज गायकवाडने 26(16), अंजिक्य रहाणेने 27(13), रायडूने 19(08) धावांची खेळी केली. कर्णधार धोनी शून्यावर बाद झाला. शिवम दुबेने नाबाद 32(21) आणि रविंद्र जडेजाने नाबाद 15(06) धावांची खेळी करत संघास विजय मिळवून दिला.
गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 3 तर नूर अहमदने 2 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी,चेन्नईचा कर्णधार धोनीने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शन याच्या झंझावाती 96 धावांच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या गमावत 214 धावांपर्यंत मजल मारली. साई सुदर्शनशिवाय वृद्धीमान साहा याने 54 धावांचे योगदान दिले.
चेन्नईकडून मथिशा पथीराना याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर दिपक चहर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.