सातारा – बांधकामातील काही त्रुटींमुळे शहराच्या मध्यवर्ती असणारा ग्रेड सेपरेटर चर्चेत आला आहे. वायसी कॉलेजकडून तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सेपरेटरच्या पहिल्या दहा मीटरच्या अंतर्गत भागात पाणी साचून राहत असून वाहनचालकांना तळ्यातून प्रवास केल्याचा अनुभव मिळत आहे. सेपरेटरच्या सिलिंगमधून पाणी गळत असल्याने नक्की बांधकाम विभागाने सेपरेटर कसा बनवला हा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर सातारा पालिकेला ग्रेड सेपरेटरची देखभाल परवडणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारा पालिकेच्या सत्ताधारी सातारा विकास आघाडीने शहराच्या वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ग्रेड सेपरेटर अस्तित्वात आणला. तब्बल पावणेतीन वर्ष चाललेल्या या कामामध्ये तब्बल 60 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या कामाला आकर्षक बनवण्यासाठी ग्रेड सेपरेटरच्या भिंतीवर कास पठाराच्या फुलोत्सवाची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. आता हाच ग्रेड सेपरेटर नवीन वादाचे आमंत्रण ठरला आहे.
सेपरेटरच्या अंतर्गत भागात फुटपाथ बांधलेले नाहीत. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी बिनधास्त रस्त्यावरून चालत जात असल्याने येथे अपघाताचा धोका संभवतो. यंदाच्या पावसाळ्यात ग्रेड सेपरेटरच्या मार्गिकावर वाहनचालकांना तळ्यातून जात असल्याचा अनुभव येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन दिवसांपूर्वी रस्ता अडवून तेथील पाणी काढावे लागले होते. लगतच्या चरीमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी उताराची सोय येत नसल्याने पाणी तेथेच थांबून राहत आहे. त्यामुळे अंतर्गत डांबरीकरण केलेले रस्ते खराब होण्याची भीती असून तोंडावरच मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे ग्रेड सेपरेटरच्या कामाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे.