कोपरगाव – कोपरगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रति देऊन सम्यक फाउंडेशनने डॉ. आंबेडकरांच्या विचारांची जयंती साजरी करून एक नवा आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी काढले.
सम्यक फाउंडेशनच्या वतीने लुंबिनी बुद्ध विहार येथे आयोजित भीम जयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निरीक्षक देसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सम्यक फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र विधाते होते. जयंतीच्या मिरवणूक व इतर खर्चाला फाटा देऊन संविधानाच्या प्रति विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आल्या. एम. के. आढाव विद्यालयाच्या विद्यार्थिनी तसेच भास्कर वस्ती येथील शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
संविधानाचा अंगीकार केल्याने आपले जीवन जगणे सुलभ होईल म्हणून त्याचे वाचन करून अनुकरण करा, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र विधाते यांनी सांगितले. आढाव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वानखेडे, विश्वस्त प्रल्हाद जमधडे तसेच एसटी युनियनचे प्रसन्न खंडवे व सम्यक फाउंडेशनचे विश्वस्त श्रीकांत लिमजे, अशोक ओव्हाळ, दिकोंडा मल्लय्या, मनोज श्रीखंडे, सीमा नरवडे, कविता दिवारे उपस्थित होते.