वॉशिंग्टन – सौजन्याचा भाग म्हणून अमेरिकन सरकारच्या गुप्त माहितीचा अहवाल माजी अध्यक्षांनाही सादर केला जातो. ही प्रथा गेले अनेक वर्ष तेथे सुरू आहे. पण माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ही माहिती सादर केली जाऊ नये अशी सुचना विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की ट्रम्प यांच्या वर्तनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना ही माहिती सादर करणे आपल्याला प्रशस्त वाटत नाही. त्यांना त्याची गरजही नाही अशी टिपण्णीही त्यांनी केली. त्यांना ही गुप्तचर माहिती देऊन उपयोग काय असा सवालही त्यांनी केला आहे. वस्तुस्थिती लक्षात न घेताच दुसराच काही तरी कांगावा करणाऱ्या माणसाला अशी स्वरूपाची माहिती देण्याने काही उपयोग नाही असेहीं बायडेन यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या प्रशासनातीलच काही अधिकारी आणि त्यांच्याच पक्षातील काही संसद सदस्यांनी ट्रम्प यांना ही माहिती सादर करण्याची गरज नसल्याचे जाहीर मतप्रदर्शन केले आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या उपसंचालकपदावर काम केलेले सुसान गॉर्डन यांनी वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाच्या संपादकीय पानावर एक लेख लिहुन ट्रम्प यांना अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या माहितीचा अहवाल सादर करणे कसे धोकादायक आहे याचे विश्लेषण केले आहे. त्यांनी म्हटले आहे की ट्रम्प हे व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडे अन्य देशांच्या लोकांचेही येणे जाणे असते त्यांच्याकडून या माहितीचा दुरूपयोग होऊ शकतो.