इंदापूर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राजकारणामध्ये काय चीज आहेत. ते इंदापूर व पुरंदर तालुक्यातील जनतेला चांगले माहित आहे. मला कोणीतरी सांगितलं, तालुक्यातील विरोधक विकास करण्यासाठी निधी मागायला जाणार आहेत. इंदापूर तालुक्याचा विकास करायला मी सज्ज आहे. त्यामुळे मी कुठे गेलोय का?
इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जास्त कार्यकर्ते नेते आकर्षित होत आहेत. या महिन्यांमध्ये जनतेने कधीही विचार केला नसेल इतक्या करामती झालेल्या दिसतील. याच भितीने, विरोधक अजितदादांना भेटणार असे वक्तव्य करत, तालुक्यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत. अशी टीका सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
इंदापूर तालुक्यातील निरवांगी गावात विविध विकासकामांचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभेत भरणे बोलत होते. निमगाव केतकी- पिटकेश्वर- निरवांगी- खोरोची- सराटी- पिंपरी- निरा नरसिंहपूर प्रजिमा 121- 10 कोटी रुपये, निरवांगी प्रा. आरोग्य के. येथे प्रसूतीगृह-10 लाख, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी निवासस्थान – 30 लाख, प्रा. आरोग्य केंद्र दुरुस्ती- 7 लाख,
बी. के. बी. एन. ते राऊत वस्ती वाघाळवस्ती रस्ता कॉंक्रीटीकरण-10 लाख, बी. के. बी. एन. ते वाघाळवस्ती रस्ता कॉंक्रीटीकरण-10 लाख, निरवांगी ग्रामपंचायत कार्यालय इमारत 12 लाख, लक्ष्मीमाता मंदिर सभामंडप 5 लाख, पाणी टंचाई टाकी – 20 लाख, खुली व्यायामशाळा- 5 लाख, अशा 30 कोटी 80 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रचंड ताकदीचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. त्यांना थांबवण्यासाठी माझे आणि अजितदादांचे किती चांगले आहे. असे दाखवण्याचा प्रयत्न तालुक्यातील विरोधक करीत आहेत. कोणताही विरोधक अजितदादांच्या नादी लागला तर, त्याचे काय होते, हे इंदापूर व पुरंदर तालुक्याने पाहिले आहे. जनतेने विरोधकांना घरी बसवले असताना देखील काहीही संबंध नसताना उद्घाटन करत सुटले आहेत.
-दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री