पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत सुमारे 3 हजार 956 वकिलांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. निवडणुकीसाठी 5 हजार 801 वकिलांची मतदार यादी जाहीर झाली होती. यंदा बॅलेट पेपरवर मतदान झाले असून, रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.
अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार, उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी सहा उमेदवार, सचिव पदाच्या दोन जागांसाठी चार तर ऑडिटरच्या एका जागेसाठी तीन जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खजिनदाराची यापूर्वीच बिनविरोध आणि दहा कार्यकारिणी सदस्यांची सर्वानुमते निवड झाली आहे. करोनामुळे दोन वर्षानंतर ही निवडणूक होत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. बोगस मतदान टाळण्यासाठी मतपत्रिकेवर होलोग्रामची व्यवस्था करण्यात आली होती. प्रमुख निवडणूक अधिकारी ऍड. अशोक संकपाळ आणि सहायक निवडणूक अधिकारी ऍड. मंगेश लेंडघर यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.