कोल्हापूर : कोल्हापुरातील शिरोलीमध्ये अल्पवयीन प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोशल मीडियावर स्टेटस ठेवत या प्रेमीयुगुलाने गळफास घेत आपले आयुष्य संपवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
“ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायलाही तयार व्हा, अन्यथा प्रेम करु नका, प्रेम करताना जात धर्म बघू नका,” अशा प्रकारचे स्टेटस ठेवत दोघांनीही आयुष्याची अखेर केली. या घटनेत आत्महत्या केलेला तरुण मुस्लीम तर युवती हिंदू आहे. आत्महत्या केलेला तरुण 18 वर्षांचा तर युवतीचे वय 16 वर्ष असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, एकतर्फी प्रेमात अपयश आल्याने 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात घडली होती. विठ्ठल रोंगाप्पा जाधव असे त्या तरुणाचे नाव होते. ही घटना 23 ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून समुपदेशन केले होते.
यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. “त्या मुलीने माझा केवळ वापर केला. निर्भया पथकाची भीती दाखवून त्यांनी माझ्याकडून तिला परत मेसेज न करण्याचे जबरदस्तीने लिहून घेतले. तिला मी विसरु शकत नसल्याने शेवटचा हा पर्याय निवडला. आय एम सॉरी,” असे त्याने चिठ्ठीत लिहिले होते.