मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आयोध्येला जाण्याची घोषणा केल्यापासून राजकारण तापलं आहे. त्यातच राज यांना भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कडाडून विरोध करत इशारा दिला होता. त्याला मनसेच्या काही नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र मनसेच्या नेत्यांना भाजप खासदाराकडून फटकारलं गेलं. त्यामुळे राज ठाकरे यांनी तातडीने पत्रक काढून कार्यकर्त्यांना शांत राहण्याची ताकीद दिलेली दिसत आहे.
राज ठाकरे म्हणाले की, माझ्या आयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमले आहेत. ते याबाबत बोलतील. इतर कोणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये.
तसेच इतरही कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे. त्यांनीही जबाबदारी बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
मनसेचे नेते तुलसी जोशी यांनी खासदार ब्रिजभूषण यांना फोन केला. मात्र जोशी यांनी ब्रिजभूषण यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. फोन करून जोशी म्हणाले की, मी राज ठाकरे यांचा छोटासा मनसे सैनिक आहे. माझे नाव तुलसी जोशी आहे. आपण प्रभू रामचंद्रांच्या अयोध्यामधून खासदार आहात. तुमचे स्वागत आहे. मात्र, राज ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केले तर तुमचे नाव गिनिज बुकमध्ये, लिम्का बुकमध्ये तुमची नोंद होणार नाही. तुम्ही जे राज ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले आहे, ते योगींच्या सल्ल्याने केले का? तुमचा तसा स्वभाव नाही. मात्र, योंगीच्या सल्लाने तुम्ही बोलत आहात, असा प्रश्न जोशी यांनी केला.
त्यावर खासदार बृजभूषण स्पष्ट म्हणाले, योंगीकडून आम्ही सल्ला घेत नाही. योगींना गरज पडली तर ते आमच्याकडून सल्ला घेतात. या संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे.