नवी दिल्ली – पंजाबमधील आम आदमी पार्टीचे आमदार जसवंत सिंग गज्जन माजरा यांच्याशी संबंधित तीन ठिकाणांची सीबीआयने शनिवारी कसून तपासणी केली, सुमारे 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या बॅंक कर्ज गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने संगरूर येथील ठिकाणांची तपासणी केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॅंक ऑफ इंडियामधील 40.92 कोटी रुपयांच्या बॅंक कर्ज गैरव्यवहारप्रकरणी “एफआयआर’ दाखल झाल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या असलेले आणि आधार कार्ड जोडलेले 94 कोरे धनादेश सीबीआयने जप्त केल्याचे समजते आहे.
अंदाजे 16.57 लाख रुपयांची रोकड, सुमारे 88 विदेशी चलनाच्या नोटा, काही मालमत्तेची कागदपत्रे, अनेक बॅंक खाती आणि इतर दोषी कागदपत्रे झडतीदरम्यान सापडली आणि जप्त करण्यात आली, असे सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी सांगितले.
सीबीआयने बॅंक ऑफ इंडिया, लुधियानाच्या तक्रारीवरून सिंग, तारा कॉर्पोरेशन लिमिटेड (मलौध ऍग्रो लिमिटेड असे नाव बदलले आहे) गौनसपुरा, तहसील- मालेरकोटला (पंजाब) आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अमरगडचे आमदार असलेले सिंग हे कंपनीत संचालक आणि हमीदार होते. सिंग यांचे भाऊ बलवंत सिंग आणि कुलवंत सिंग आणि पुतणे तेजिंदर सिंग, सर्व संचालक आणि जामीनदार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
बॅंकेने 31 मार्च 2014 रोजी खाते ओनुत्पादक मालमत्ता म्हणून घोषित केले होते आणि नंतर 9 फेब्रुवारी 2018 रोजी अंदाजे 40.92 कोटी रुपयांची थकबाकी गैरव्यवहार म्हणून म्हणून घोषित केले होते.