सभापतींच्या निवडीतही महाविकास आघाडी कायम; भाजपची पुन्हा माघार
नगर – जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारल्यानंतर आज झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये विषय समितीच्या समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे विद्यमान सभापती उमेश परहर यांची व महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी कॉंग्रेसच्या मीराताई शेटे यांची तर इतर दोन समित्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे सुनील गडाख व शिवसेनेचे काशीनाथ दाते यांची बिनविरोध निवड झाली.
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीप्रमाणेच विषय समिती सभापतींच्या निवडीही कॉंग्रेस, सेना,राष्ट्रवादी व क्रांतिकारी शेतकरी पक्षाने महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येत केलेली आघाडी कायम ठेवत बिनविरोध बिनविरोध निवडी केल्या. सभापतीपदाच्या निवडीतही संख्या बसणार नाही हे लक्षात आल्यानंतर भाजपाने या निवडणुकीतून काढता पाय घेऊन माघार घेतली आहे.
जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज मंगळवारी दुपारी विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन होते. समाजकल्याण समितीसाठी राष्ट्रवादीचे उमेश परहर व भाजपचे सोमनाथ पाचारणे यांनी तर महिला व बाल कल्याण समितीसाठी कॉंग्रेसच्या मीरा शेटे, भाजपच्या दिपाली गिरमकर व सेनेच्या राणी लंके, सुषमा दराडे या चार जणांनी अर्ज भरले.
इतर दोन समित्यासाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे सुनील गडाख, शिवसेनेचे काशीनाथ दाते, भाजपचे जालिंदर वाकचौरे, कांतीलाल घोडके, कॉंग्रेसचे रामहरी कातोरे, सेनेचे शरद झोडगे, अनिल कराळे, शरद नवले यांनी अर्ज भरले होते.
मात्र गिरमकर, दराडे, लंके, पाचारणे यांनी माघार घेतली तर इतर समित्यांसाठी वाकचौरे, घोडके, कातोरे , झोडगे, कराळे, नवले यांनी माघार घेतली. त्यामुळे समाजकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे उमेश परहर यांची तर महिला व बाल कल्याण समितीसाठी कॉंग्रेसच्या मीरा शेटे यांची आणि विषय समितीच्या अन्य दोन समिती सभापतीपदी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे सुनील गडाख व शिवसेनेचे काशीनाथ दाते यांची बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी, युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुशराव काकडे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी नुतन समिती सभापतींचा सत्कार केला.
दरम्यान या निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व कायम ठेवलेले आहे. मागील अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र आल्यामुळे भाजपाने त्यावेळा निवडणुकीतून माघार घेतली होती. यावेळेला सुद्धा महाविकास आघाडी कायम राहिल्यामुळे भाजपचे संख्याबळ नसल्यामुळे त्यांना माघार घेण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. पक्षाचे सदस्य म्हणून या वेळेला महाविकास आघाडीतील सहभागी पक्षांच्या गटनेत्यांनी आपल्या सर्व सदस्यांना व्हीप बजावला होता.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरीक्षक अंकुश काकडे म्हणाले, महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये स्थापन झाल्यानंतर नगर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी स्थापन झाली अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बिनविरोध झाल्या तशा पद्धतीचे या निवडी येथे करायच्या होत्या.
अनिल कराळे झाले नाराज
शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे यांना शिवसेनेच्यावतीने समिती दिली जाणार अशी चर्चा होती. काशिनाथ दाते यांचे नाव पुढे आल्यानंतरही अनिल कराळे यांचे नाव चर्चेत होते. कारण क्रांतिकारी शेतकरी पक्षाला संधी न देता दोन समित्या सेनेला मिळणार असल्याची चर्चा होती पण प्रशांत गडाख हे दिवसभर सुनील गडाख यांच्यासाठी ठाण मांडून आग्रही राहिले. व दाते यांच्या नावासाठी माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी ठाम राहिल्याने कराळे यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे ते नाराज होऊन निघून गेले. सेनेचा पक्षाचा व्हीप त्यांच्या सहीने निघाला असला तरी तो संदेश कार्ले यांनी सदस्यांना वाटला. कार्ले यांचीही संधी या तडजोडीत गेल्याने तेही नाराज झाले.
शिवसेना पक्षाने मला या पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली व महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रितपणे आगामी काळामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितपणे योगदान देऊन विकासाची कामे मार्गी लावणार आहोत. विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी यांच्यामुळे मला या पदावर काम करण्याची संधी मिळत आहे.
काशिनाथ दाते सभापतीजिल्हा परिषदेचा कामाचा मोठा अनुभव मला आहे. मात्र आता या पदामुळे मला मोठी संधी मिळाली आहे. माजी खासदार यशवंतराव गडाख,मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लावणार आहे.
सुनिल गडाख सभापतीराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,राजेंद्र गुंड यांच्या व तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मला पुन्हा समाजकल्याण कमिटी मिळाली आहे. गोरगरीब जनतेचे प्रश्न आहेत ते कमिटीच्या माध्यमातून मी सोडवणार आहे. मी चांगले काम केले त्यामुळे मला परत संधी मिळाली आहे.
उमेश परहर सभापतीमला सभापतिपदाची संधी देणाऱ्या सर्वांची मी आभारी आहे. आमचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सर्वांच्या सहकार्यांने मी कमी अनुभव असतानाही चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. ज्या महिला विविध योजनेपासून वंचित आहे. त्यांच्यापर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व योजना नेण्याचा माझा प्रयत्न असेल.
मीराताई शेटे सभापती