पिरंगुट – देशात सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत आहेत. यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असून ही दुर्दैवी बाब आहे, त्यामुळे वाहन चालविताना नियमाचे पालन करा, असे आवाहन मोटर वाहन निरीक्षक परमेश्वर काटकर यांनी केले.
पिरंगुट (ता. मुळशी) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. ये
थील मयुर मोटार ड्रायव्हिंग स्कुलच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक किरण बनसोडे, पौडच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते, वाहतूक पोलिस मयुर निंबाळकर, माजी उपसभापती भानुदास पानसरे, ग्रामपंचायत सदस्य महेश वाघ, मयुर मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक अजित वाघ, अनिकेत वाघ, गणेश वाघ, अमोल मारणे उपस्थित होते. काटकर म्हणाले की, तरुण मुलांचा अपघाती मृत्यू होणे हे हानिकारक आहे.
त्यासाठी रस्ते सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. आयुष्यात विविध क्षेत्रांत करिअर करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. वेग मर्यादा पाळली पाहिजे. पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते म्हणाल्या, वाहतूक नियमांचे पालन करावे असे नागरिकांना का सांगावे लागते, याचा प्रत्येकाने विचार करावा. कार्यक्रमाचे नियोजन अनिकेत वाघ आणि गणेश वाघ यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण सातव यांनी केले.