न्यूयॉर्क – अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संसदेतील हिंसाचार चांगलाच जड जाताना दिसत आहे. विरोधी डेमोक्रेटिक पक्षासह रिपब्लिकनच्या सिनेटर्सनीही ट्रम्प यांना कॅपिटॉल हिल हिंसाचारास जबाबदार धरले आहे. सहकाऱ्यांनी राजीनाम्याचा धडाका लावून ट्रम्प यांना एकटे पडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
हिंसाचाराबाबत रिपब्लिकन पार्टीच्या जवळपास 100 सिनेटर्सनी पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनाच थेट जबाबदार धरले आहे. ट्रम्प यांचे सहकारी तसेच त्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे सत्र कायम ठेवले आहे. शुक्रवारपर्यंत 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला. शिक्षण मंत्री बेट्सी डेवोस, राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार मॅट पॉटिंगर यांचा यात समावेश आहे.
हिंसाचारामुळे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची अब्रू धुळीस मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हिंसक समर्थकांवर कारवाईबाबत मोठा निर्णय घ्यावा, यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला आहे. सिनेट स्पीकर नॅन्सी पेलोसी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी करीत आहेत.
दरम्यान, संसदेवरील हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे हिंसाचारातील बळींचा आकडा 5 वर गेला आहे. ट्रम्प यांची नाचक्की झाल्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
ट्रम्प यांच्याविरुद्ध संविधानातील आर्टिकल 25 चा वापर करून त्यांना हटवले जाऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. कारण अशा परिस्थितीत उरलेल्या 12 दिवसांत पेन्स यांनाच राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.