कोलंबिया (साउथ कॅरोलिना) – अमेरिकेत पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. न्यू हॅम्पशायर येथे प्रचाराचे पहिले भाषण दिल्यानंतर ते साउथ कॅरोलिनाकडे रवाना झाले. या दोन प्रांतांमध्ये अध्यक्षीय निवडणुकीचे मतदान पहिल्यांदा होणार आहे.
ट्रम्प यांनी दोनच महिन्यांपूर्वी अध्यक्षीय निवडणुकीसाठीची आपली उमेदवारी घोषित केली होती.
आपण पूर्वीपेक्षा अधिक रागावलो आहोत आणि पूर्वीपेक्षा अधिक जास्त कटिबद्धदेखील आहोत, असे त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले. पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असताना ट्रम्प यांच्या कटिबद्धतेबाबत शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. त्याला ट्रम्प यांनी आपल्या पहिल्याच भाषणात उत्तर दिले. न्यू हॅम्पशायरमधील भाषणात ट्रम्प यांनी निर्वासितांचा प्रश्न आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यावर भाष्य केले. या मुद्द्यांवर आपली धोरणे विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या धोरणांच्या अगदी विरुद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणुकीचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते. यामुळे न्यू हॅम्पशायरचे प्राथमिक मतदानाचे महत्त्व कमी होईल. 2020 च्या निवडणुकीत न्यू हॅम्पशायरमध्ये बायडेन पाचव्या क्रमांकावर राहिले होते. त्याचा राग बायडेन या प्रांतावर काढणार असल्याचा आरोपदेखील ट्रम्प यांनी केला.
रिपब्लिकन पक्षाकडून अन्य तिघे इच्छुक…
ट्रम्प यांनी 2024 साठी आपली उमेदवारी जाहीर केली असली, तरी त्यांच्या समोर फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसॅन्टिस, माजी उपाध्यक्ष माईक पेन्स आणि साउथ कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निकी हेले यांचे आव्हान असणार आहे. हे तिन्ही नेते आगामी काही महिन्यांत आपल्याला रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. अजून प्रायमरीलादेखील खूप अवकाश असल्याने कोणाला उमेदवारी मिळेल, हे आताच सांगता येऊ शकणार नाही.