बीजिंग – चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोनुसार, चीन देशाची वार्षिक जीडीपी वाढ तीन टक्क्यांनी घसरली आहे, जी 2022 मध्ये 5.5 टक्क्यांच्या अधिकृत लक्ष्यापेक्षा खूपच कमी आहे. गेल्या वर्षी चीनचा विकास दर 1976 नंतर सर्वात कमकुवत होता. चीनची अर्थव्यवस्था अशीच घसरत राहिली, तर आर्थिक मंदी येणे निश्चितच आहे. या मंदीचा फटका केवळ चीनलाच बसणार नाही, तर जगातील 70 हून अधिक देशांना याचा फटका बसणार आहे.
कोविडमुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी चीनमध्ये गेल्या वर्षी लादण्यात आलेले निर्बंध आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी यामुळे चीनचा आर्थिक विकास दर 2022 मध्ये तीन टक्क्यांवर आला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील 50 वर्षांतील ही दुसरी सर्वात कमी वाढ आहे. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये चीनचा जीडीपी 1,21,020 अब्ज युआन किंवा $17,940 अब्ज होता.
जगातील बहुतेक देशांवर काय परिणाम होईल ?
चीनच्या जीडीपीमध्ये झालेली घट पाहता, त्याचा इतर देशांवरही खोलवर परिणाम होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. वास्तविक, चीनचा व्यापार 70 हून अधिक देशांशी आहे. चीन आशियाई देशांबरोबरच अनेक युरोपीय देशांसोबत आयात आणि निर्यात करतो. अशा परिस्थितीत चीनमध्ये मंदी आली तर हे सर्व देशही त्याच्या विळख्यात येतील. चीनवर अवलंबून असलेल्या देशांना सर्वाधिक फटका बसेल. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सर्वात वाईट परिस्थिती निर्माण होईल अशी भिती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
चीनमधील इतर अनेक शहरांमध्ये नोकरीचे संकट –
चीनच्या जीडीपीचा परिणाम तेथील नोकऱ्यांवरही दिसून येत आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार रोखले आहेत. पगार देण्याची मागणी करणारे बॅनर घेऊन अनेकजण रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. ही संकटे समोर आल्यानंतर चीन कर्जबुडव्याची आकडेवारी लपवत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, आगामी काळात जगासमोर मंदीचे संकट गडत होत असताना दिसत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.