ढाका – बांगलादेशात ‘हरकत उल जिहाद-बांगलादेश’ Harkat-ul-Jihad-al-Islami (HuJI) अर्थात “हुजी-बी’च्या 6 दहशतवाद्यांना पोलिसांच्या विशेष युनिटने अटक केली आहे. या सहा जणांपैकी एकाने अफगाणिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतले होते आणि अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन आणि तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमर याची भेटदेखील घेतली होती, असे पोलिसांनी सांगितले.
बांगलादेश पोलिसांच्या “काउंटर टेरेरिझम ऍन्ड ट्रान्सनॅशनल क्राईम’ युनिटने राजधानी ढाकामधील काही अड्ड्यांवर छापे घालून या 6 दहशतवाद्यांना अटक केली. यातील फकरूल इस्लाम याने अफगाणिस्तानात जाऊन ओसामा बिन लादेन आणि मुल्ला ओमरची भेट घेतली होती, असे ढाका महानगर पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त मोहम्मद असादुझ्झमान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
फकरूल इस्लाम हा पूर्वी टोंगी भागातल्या एका इस्लामी शाळेत चौकीदार म्हणून काम करत होता. 1988 मध्ये तो गुपचूप पाकिस्तानात निघून गेला. तेथे मुफ्ती झाकीर हुसैन या मूळ बांगलादेशी असलेल्या अल कायदाच्या कमांडरशी त्याची भेट झाली. त्यानेच फकरूलला “हुजी’मध्ये भरती करून घेतले आणि प्रशिक्षण घेण्यासाठी अफगाणिस्तानात पाठवले.
Us Presidential Election 2024 : ट्रम्प यांनी सुरू केला 2024 च्या निवडणुकीचा प्रचार
तेथे फकरूलने आधुनिक शस्त्रास्त्रे चालवण्याचे शिक्षण घेतले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने “हुजीत’ भरतीचे नवे तंत्र विकसित केले होते. “हुजी’मध्ये म्यानमारमधून निर्वासित झालेल्या रोहिंग्यांना भरती करण्याचाही त्याचा प्रयत्न होता, असेही पोलिसांनी सांगितले.