वॉशिंग्टन – अमेरिकेत पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुशंगाने त्या देशाचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना आज आणखी एक जोरदार झटका बसला आहे. अमेरिकेतील मेन या राज्यानेही राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी ट्रम्प यांना अपात्र घोषित केले आहे. या अगोदर कोलोरॅडो राज्यानेही ट्रम्प यांना अपात्र जाहीर केले असल्यामुळे ट्रम्प यांना हा दुसरा झटका बसला आहे.
जानेवारी २०२१ मध्ये सत्ता हस्तांतराच्या वेळी अमेरिका कॅपिटॉलवर झालेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून ट्रम्प यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला ट्रम्प यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.
६ जानेवारी २०२१ ची घटना (कॅपिटॉलवर हल्ला) डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसारच झाली आहे. त्यांना याची माहिती होती आणि त्यांचे त्या प्रकाराला समर्थनही होते असे मेन राज्याचे सेक्रेटरी शेना बेलोज यांनी म्हटले आहे. कायद्यातील बंड विरोधी तरतुदीच्या कलम १४ चा हवाला देत बेलोज यांनी ट्रम्प यांना २०२४ च्या निवडणुकीच्या मतदानातून हटवण्याचे निर्देश दिले.
मेनच्या दोन माजी संसद सदस्यांच्या समुहाने ट्रम्प यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती व त्यावर या महिन्याच्या सुरूवातीला प्रशासकीय सुनावणी झाली होती. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंडात सहभागी असणाऱ्या कोणाही व्यक्तीला पद ग्रहण करण्यापासून रोखणारा हा कायदा आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या निवडणूक अभियानाचे प्रवक्ते स्टीव्हन चेऊंग यांनी एक निवेदन जारी केले आहे. निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा हा पूर्णत: पक्षपाती प्रयत्न अमेरिकेच्या लोकशाहीवर हल्ला आहे. राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि डेमोक्रॅटीक पक्ष सत्तेवर आपली पकड राखण्यासाठी, सरकारी संस्थांवर आपली पकड कायम राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मेनच्या सेक्रेटरींच्या निर्णयाला ट्रम्प यांच्याकडून आव्हान दिले जाईल असे चेऊंग यांनी म्हटले आहे.