नारायणगाव – संचारबंदीच्या काळात नाका बंदीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या तपासणीवेळी फॅन्सी नंबरप्लेट लावली म्हणून दंडाची पावती फाडण्यास विरोध करीत सहाय्यक पोलीस निरीक्षक आँचल दलाल व जुन्नर पोलीस कर्मचारी यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि संचारबंदीचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश जोरी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत जुन्नर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, 24 मार्चला सायंकाळी सहाच्या सुमारास जुन्नर येथे पोलीस तपासणी नाक्यावर जुन्नर पोलिसांनी तपासणी नाका सुरू केला. या तपासणी नाक्यावर जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांचे चारचाकी वाहन (एमएच 01 बीसी 0505) पोलिसांनी अडविले. या वाहनास फॅन्सी नंबर प्लेट लावली आहे, म्हणून पोलिसांनी चालकाला दंडाची पावती फाडण्यास सांगितले.
या वाहनात चालकाशेजारी बसलेल्या आशा बुचके यांनी मोठ्या आवाजात “तुम्ही मला ओळखत नाही का? तुम्ही माझ्या गाडीची पावती कशी काय करता. मला जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माझी मदत मागून मला फिरण्यास सांगितले असताना तुम्ही मला अडवणारे कोण?’ असे म्हणत आरडाओरडा केला. यावेळी प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक आँचल दलाल यांनी बुचके यांना “तुम्ही आरडाओरडा करू नका, तुमचे गाडीचे नंबर प्लेट फॅंन्सी आहे व तुम्हाला तिची रितसर पावती करावी लागेल’ असे समजावुन सांगितले.
तरी देखील बुचके यांनी “मी पावती फाडणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा.’ असे म्हणत आँचल दलाल यांना तुमचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना फोन करून तुमची नोकरी घालवते, अशी धमकी दिली. पावतीचे पैसे वाहनचालक देत असताना आशा बुचके यांनी त्यांनाही धमकावून सांगितले की, तुम्ही अजिबात पैसे द्यायचे नाहीत. यावेळी बुचके यांनी दंडाची पावतीची रक्कम पोलिसांचे अंगावर फेकून देत “हे पैसे मी भिक म्हणून देत आहे’ असे सांगून त्या दंडाची पावती न घेताच मोठमोठ्याने शिवीगाळ करत निघून गेल्या. आशा बुचके यांच्यावर भा. दं. वि. 188, 353, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जुन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक युवराज मोहिते हे करीत आहेत.