नवी दिल्ली : करोना संसर्गाच्या मोफत चाचण्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुधारित आदेश दिला. त्यानुसार, करोनाच्या मोफत चाचण्या केवळ गरिबांसाठीच असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. याआधी न्यायालयाने 8 एप्रिलला खासगी प्रयोगशाळांनाही मोफत चाचण्या घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वांसाठी चाचण्या मोफत केल्यास खासगी प्रयोगशाळांवर आर्थिक ताण येईल.
त्यातून चाचण्यांचा वेग कमी येईल, असे त्या याचिकांमध्ये नमूद करण्यात आले होते. त्या याचिकांची दखल घेऊन न्यायालयाने सुधारित आदेश दिला. खर्च पेलू शकणाऱ्यांच्याही चाचण्या मोफत व्हाव्यात, असा आमचा हेतू नव्हता. आयुषमान भारतसारख्या योजनांत समाविष्ट असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाच मोफत चाचण्यांचा लाभ व्हावा, असे न्यायालयाने म्हटले.