सिमला : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि देशातील विविध राज्यांमध्ये अनेक प्रकारच्या प्रथा आणि परंपराचे पालन केले जाते. देशाच्या उत्तर भागामध्ये वसलेल्या हिमाचल प्रदेशामधील एका गावातही अशाच प्रकारच्या वेगळ्या प्रथेचे पालन केले जाते. या गावातील महिला वर्षातील विशिष्ट पाच दिवशी विवस्त्र राहून दैनंदिन कारभार करत असतात.
हिमाचल प्रदेशामधील डोंगराळ भागातील पिनी नावाचे हे गाव असून या गावांमध्ये पाच दिवसांमध्ये महिला अंगावर कोणतेही वस्त्र परिधान करत नाही. हिमाचल प्रदेश मधील मणिकर्ण घाटामध्ये हे पिनी नावाचे छोटेसे गाव असून कित्येक शतकापासून पाच दिवस महिलांनी विवस्त्र राहण्याची ही परंपरा पाळली जात आहे. या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये या गावातील पुरुषांना मद्यपान करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
श्रावण महिन्यातील पाच दिवसांमध्ये सर्व महिला मनापासून आणि कोणत्याही दडपणाखाली न येता या परंपरेचे पालन आजही करत आहेत. एखाद्या महिलेने या प्रथेचे पालन केले नाही तर नंतरच्या कालावधीमध्ये तिला एखादी दुःखद बातमी समजू शकते असा समज आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे विवस्त्र राहण्याचे या प्रथेचे पालन करत असताना पती आणि पत्नी यांना एकमेकांपासून दूर राहावे लागते. या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये पती आणि पत्नी एकमेकांशी एक शब्दही बोलत नाहीत.
एवढेच नाहीतर या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये एकमेकांकडे पाहून हसण्यासही बंदी घालण्यात आली आहे. गावातील महिला या पाच दिवसांमध्ये या प्रथेचे पालन करत असताना या गावामध्ये कोणत्याही त्रयस्थ माणसाला प्रवेश दिला जात नाही.