मुंबई – बॉलीवूडमधील अनेक स्टारकीड आता अभिनय क्षेत्राकडे वळत आहेत. यातच आता रविना टंडनची (Raveena Tandon) मुलगी राशा थडानी देखील आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रविनाप्रमाणेच राशा देखील खूप सुंदर दिसते. मात्र आता तिने देखील आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राशा दाक्षिणात्य अभिनेता रामचरणच्या सिनेमात काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राशा थडानी लवकरच तेलुगू सिनेमातून अभिनयाला सुरुवात करणार असून रामचरणसोबत ती झळकणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. राशा अजय देवगणची बहीण नीलमचा मुलगा अमन देवगणसोबत बॉलिवूड डेब्यू करणार आहे. अभिषेक कपूरच्या एक्शन एडव्हेंचर फिल्ममध्ये या दोघांची जोडी दिसणार असल्याची शक्यता काही दिवसांपासून वर्तवली जात आहे. मात्र याबद्दलही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नेमकं राशा कधी आणि कोणासोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार हे स्पष्ट झालेले नाही.
राशाच्या डेब्यूसंदर्भात अभिनेत्री रवीना म्हणाली होती की, ‘सध्या राशा शिक्षण पूर्ण करत असल्याने त्यानंतर ती अभिनय क्षेत्रात पदार्पणाचा विचार करेल. तसेच कंफर्टेबल असेल तर ती फिल्ममध्ये किसींग सीन्स देईल. मात्र तिला करायचं नसल्यास कोणीही तिच्यावर जबरदस्ती करु शकत नाही.’
दरम्यान, मार्च महिन्यात रवीना टंडनने भोपाळच्या जहाँनुमा रिट्रीटमध्ये मुलगी राशाचा 18 वा वाढदिवस साजरा केला होता. राशाचा जन्म 16 मार्च 2005 रोजी झाला असून ती फक्त 18 वर्षांची आहे. राशासाठी येथे सरप्राईज पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक अभिषेक कपूर, रवीना टंडन, तिचा पती अनिल थडानी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक लोक उपस्थित होते.