मुंबई – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये तळ ठोकलाय. शिंदेंनी घडवून आणलेल्या या राजकीय भूकंपामुळे राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर साकारण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मविआचे नेत्यांनी शिंदे आणि समर्थक आमदारांचे बंड कसे मोडून काढायचे यासाठी बैठकांचा धडाका लावला आहे.
दुसरीकडे शिंदे यांचा गट मात्र दिवसागणिक अधिकच बळकट होत चाललाय. एकनाथ शिंदे हे आपला गट हाच शिवसेना असल्याचा दावा करणार असल्याचीही चर्चा आहे. शिंदे यांनी अशी चाल खेळल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच बाजूला सारलं जाते की काय अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
अशातच शिंदे गटाने नेमलेले प्रतोद भरत गोगावले यांनी एका खासगी वृत्त वाहिनेशी साधलेला संवाद शिंदे गट थेट पक्षावर ताबा घेण्याची तयारी करतोय का अशी शंका व्यक्त करण्यास वाव देणारा आहे.
त्याचं झालं असं की, एबीपी माझा या वृत्त वाहिनेने गोगावले यांच्याशी संवाद साधला. यावेळी महिला पत्रकाराने गोगावले यांना तुम्ही उद्धव ठाकरे यांना तुमचे नेते मानता का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देण्याचे गोगावले यांनी सुरुवातीला टाळले. मात्र पत्रकाराने हाच प्रश्न लावून धरल्यानंतर गोगावले यांची चांगलीच भंबेरी उडाली.
‘आम्ही आताच काही सांगू शकत नाही. आम्हाला थोडा विचार करुद्या’ असं सांगून गोगावले यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकाराने पुन्हा एकदा विचारल्यानंतर, ‘आमचे नेते होते. आम्ही नाही म्हणत नाही.’ असं उत्तर दिलं. यावर पत्रकाराने म्हणजे ते तुमचे नेते होते असं म्हणायचं आहे का? असा प्रश्न केला. यानंतर मात्र गोगावले संतापून आजच सगळं विचारता उद्या साठी ठेवा ना काहीतरी असं म्हणतायेत.
दरम्यान, गोगावले यांचा हा संवाद सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मानण्यास दिलेला नकार शिंदे गटाने वापसीचे दोर कापले असल्याचं बोललं जात आहे.