मुंबई – आमचा गटच खरी शिवसेना आहे असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने बंडखोर आमदारांचे सदस्यत्व पक्षांतर बंदी कायद्यान्वये रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या बातम्यांवर शिंदे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असे म्हणत त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.
गुरुवारी रात्री उशिरा पोस्ट केलेल्या ट्विटच्या मालिकेत शिंदे यांनी हा दावा केला आहे. शिवसेनेचे 37 आमदार आणि 10 अपक्षांसह गुवाहाटी येथे तळ ठोकून असलेले शिंदे म्हणाले की, घटनेच्या 10 व्या अनुसूचीनुसार, पक्षाचा व्हिप विधिमंडळाच्या कामकाजासाठी जारी केला जातो पण तो बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जारी केला जाऊ शकत नाही.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे शिंदे कॅम्पमधील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.
त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय या संदर्भात आहेत. तुम्ही कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहात? आम्हाला तुमचा खेळ आणि कायदाही समजतो. तुम्ही आमच्या 12 आमदारांवर कारवाई करण्यास सांगू शकत नाही कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान आणि खरे शिवसेना आणि शिवसैनिक आहोत. खरे तर संख्या नसतानाही गट स्थापन केल्याबद्दल आम्ही तुमच्यावर कारवाईची मागणी करतो.
बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांची महाराष्ट्र विधानसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागी पक्षाने अजय चौधरी यांची नियुक्ती केली. मात्र, बंडखोर गटाने शिंदे यांना गटनेतेपदी कायम ठेवण्याचा ठराव मंजूर केला आणि सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची मुख्य व्हीप म्हणून नियुक्ती केली. सुनील प्रभू यांनी बंडखोरांना पत्र पाठवून बुधवारी संध्याकाळी मुंबईत होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहावे अन्यथा पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत कारवाईला सामोरे जावे, असा इशारा दिला होता.