शरद पवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले
सहा कार्डियाक ऍम्ब्युलन्सची सोय
पुणे – करोना बाधितांसाठी उभारलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील असुविधांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. त्यांनी याविषयावरून प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. दरम्यान, शहराची गरज ओळखून सहा कार्डियाक ऍम्ब्युलन्स पुढील तीन दिवसांत उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेवर कार्डियाक ऍम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याविषयी पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुण्यातील बिघडलेल्या स्थितीला नेमके जबाबदार कोण? जम्बोचा उपयोग काय? लोकांना दिलासा मिळतो का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत पवार यांनी
खरडपट्टी केली.
करोना नियंत्रणासाठी राज्य सरकार आणि महापालिका उपाय योजना करत आहे. मात्र बाधितांची संख्या वाढत आहे. त्याची दखल घेत पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली.जुन्या-नव्या उपायांवर फारशी चर्चा न करता पुण्यात नेमके काय चालले आहे? सध्याच्या परिस्थितीवर कोणाचे नियंत्रण आहे? खरोखरच परिस्थिती
आटोक्यात आणण्यात प्रयत्न होत आहेत का, हे पवार यांनी विचारले असता नागरिकांची तपासणी वाढवली आहे. संपर्कातील व्यक्तींचीही तपासणी होत आहे. रुग्णांना वेळेत नेमके उपचार मिळावेत, यासाठी जम्बो आणि अन्य यंत्रणा उभारल्यामुळे रुग्णांना विलग करण्यापासून अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळत आहेत, असे ठेवणीतील उत्तर अधिकाऱ्यांनी दिले.
दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्यांशी चर्चा करत, पक्षाच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून लोकांना मदत करावी, अशा सूचना पवार यांनी केल्या. या बैठकीला खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, अंकुश काकडे यांच्यासह महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ उपस्थितीत होत्या. नेमक्या कोणत्या उपाययोजना करा आणि मुळात नागरिकांना धीर द्या, हे पवारांनी आवर्जून पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्याचवेळी महापालिका आणि प्रशासकीय यंत्रणेतील गोंधळाबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्याकडे तक्रारी केल्या.
शनिवारी पुण्यात मॅरेथॉन बैठका
पवार यांनी शनिवारी पुण्यात चार मॅरेथॉन बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकीना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे उपस्थित राहणार आहेत.