धारदार शस्त्राने वार केल्याने मृत्यू
पुणे – पैसे चोरण्यासाठी आलेल्यांना तरुणाने विरोध केल्याने त्याची दोघांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. हा प्रकार गरुवारी रात्री घडला. काही दिवसांपूर्वीच एका निवृत्त सहायक पोलीस निरीक्षकावरही मोबाइल चोरांनी हल्ला केला होता. त्यामुळे या भागातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागेश दगडू गुंड (37, रा. करुळ, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कमलाकर शरनू घोडके (29, रा. पौड रस्ता, कोथरुड) यांनी फिर्याद दिली. गुंड आणि घोडके दोघेही वाहनचालक आहेत. गुंड हे लॉकडाऊनमध्ये कुटुंबासह मूळगावी गेले होते. त्यांना शुक्रवारी बावधन येथून नाशिकसाठी वाहतुकीची वर्दी मिळाली. यामुळे तो गुरुवारी रात्री घरातून पुण्याला येण्यासाठी निघाला होता. गुंड यांनी गुरुवारी रात्री सव्वाअकरा वाजता घोडकेंना फोन करून “स्वारगेट बसथांब्यावर थांबलो असल्याचे सांगत तेथे न्यायला ये’ असा निरोप दिला. त्याप्रमाणे घोडके दुचाकी घेऊन तेथे आले. तेथे त्यांना बसथांब्यावरील खुर्चीवर गुंड यांची पिशवी व बॅग दिसली. मात्र, नागेश कुठेच दिसला नाही, यामुळे त्याने नागेशला फोन लावला असता तो उचलून लगेचच कट केला. यानंतर परत फोन लावला असता, तो बंद होता.
फिर्यादी गाडी वळवून परत जायच्या तयारीत असतानाच त्याला नागेशने आवाज दिला. नागेशच्या आवाजाच्या दिशेने गेला असता तेथे तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. फिर्यादीने नागेशला काय झाले विचारले असता, दोन ऍक्टिव्हावरील तरुण माझ्या खिशातील मोबाइल आणि पैसे हिसकावत होते. मी त्यांना विरोध केला असता त्यातील एकाने धारदार वस्तूने मांडीवर मारून माझा मोबाइल व पैसे चोरून नेल्याचे सांगितले.
फिर्यादीने तातडीने स्वारगेट पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून नागेशला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.