माउलींचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात
आळंदी –
नामा म्हणे आले वैष्णव।
अलंकापुरी मिळाले देव ।।
समाधी सुखें ज्ञानदेव ।
बैसते झाले ।।
माउली माउलीचा जयघोष… टाळ, मृदंगाचा गजर… भगव्या पताका नाचवत… मुखी माउलीनाम… पुंडलिक वरदे हरि विठ्ठल आणि टाळ-मृदंगाचा गजर करीत माउलींच्या समाधीवर लाखो वैष्णवांनी तुळशीपत्र, मंजिऱ्या आणि फुलांची मुक्त उधळण व घंटानाद करीत 724वा संजीवन समाधी दिन सोहळा लाखो वैष्णवांनी याची देही, याची डोळा अनुभवला. तर माउलींच्या समाधी प्रसंगाचे वर्णन कीर्तनातून ऐकताना वारकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
माउलीचे मंदिरात श्रींच्या संजीवन समाधी दिनास विविध धार्मिक कार्यक्रमांनी भल्या पहाटेच सुरुवात झाली. भल्या पहाटे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास-ढगे पाटील यांचे हस्ते पवमान अभिषेक, दुधारती प्रथा परंपरेप्रमाणे झाली. संत नामदेवराय यांच्या 18व्या वंशजांच्या हस्ते श्रींची महापूजा झाली. भाविकांच्या महापूजा या दरम्यान सुरू झाल्या. त्यानंतर हभप नामदास महाराज परिवाराने नामदेव महाराज यांच्या वैभवी दिंडीतून श्रींच्या पादुका मंदिरात दिंडीने प्रदक्षिणा करीत आणल्या.
दरम्यान, गाभाऱ्यात भाविकांच्या महापूजा सुरू होत्या. पुढे महाद्वारात काल्याचे कीर्तन सेवा सुरू झाली. कीर्तन सेवा रुजू करून हैबतरावबाबा यांचे दिंडीचा मंदिरात हरिनाम गजरात प्रदक्षिणेस प्रवेश झाला. तत्पूर्वी मंदिरात नामदेव महाराज यांचे वंशज स्व. हभप केशव महाराज नामदास यांचे चिरंजीव भावार्थ महाराज यांचे माउलींच्या संजीवन समाधी प्रसंगावर आधारित कीर्तनसेवेत हृदयस्पर्शी वाणीतून समाधी प्रसंगात माउलींचे जीवनकार्य आणि सोहळा भाविकांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि भाविकांच्या नेत्रांतून अश्रू तरळले.
टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत दुमदुमला
त्यापूर्वी श्रींच्या गाभाऱ्यात महापूजा बंद करून स्वकामच्या स्वयंसेवकांनी श्रींचा गाभारा स्वच्छ केला. गाभारा स्वच्छतेनंतर माउलीच्या मंदिरातील क्षेत्रोपाध्यानी श्रींच्या संजीवन समाधीवर वेदमंत्रोच्चारात श्रींच्या संजीवन समाधीची पूजा पुष्पहार अर्पण करीत केली. श्रींच्या समाधीची पूजा परंपरेप्रमाणे बांधली. जसजशी श्रींचा समाधी प्रसंगाची वेळ समीप येत होती. तशी मंदिरासह महाद्वारात भाविकांची एकाच गर्दी उतरोत्तर वाढली. मिळेल त्या जागेत थांबून भाविकांनी श्रींच्या संजीवन समाधीदिन सोहळा प्रसंगी कीर्तन सेवेस हजेरी लावली. तर हरिनाम गजरात शहरात माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा झाला.
यावेळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे, डॉ. अभय टिळक, डॉ. आजित कुलकर्णी, योगेश देसाई, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, माउलींची मानकरी दिनेश कुऱ्हाडे, योगीराज कुऱ्हाडे, मानकरी राहुल चिताळकर पाटील, योगेश आरु, अनिल कुऱ्हाडे, खासदार संजय जाधव, नगराध्यक्षा वैजयंता उमरेगकर, डी. डी. भोसले पाटील, मिलिंद एकबोटे, अजित वडगावकर, राम गावडे, रामभाऊ भोसले, आळंदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र चौधर, आळंदीकर ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदाय मधील महाराज मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
नामदेव महाराजांच्या वंशजांनी परंपरा ठेवली कायम
संत नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आळंदी मार्गक्रमण करीत असताना दिवे घाटात संत नामदेव महाराज यांचे 17वे वंशज सोपान महाराज तुळशीदास नामदास यांचे अपघाती निधन झाले. आपली कुटुंबामार्फत होणारी ही किर्तनसेवा त्यांचे चिरंजीव हभप भावार्थ महाराज नामदास यांनी रुजू केली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की, संत सेवा हीच भगवंताच्या प्राप्तीचे महाद्वार आहे.
संतांच्या देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे. देव भक्तवात्सल्य असतात तर संत जगवात्सल्य असतात. त्यामुळे संत महिमा शब्दांत सांगता येत नाही. या सृष्टीवरील प्रत्येक संत स्वतःच्या दुःखांना विराम देऊन दुसऱ्यांचे दुःख सावरण्यास पुढे येतात. त्यांना सुख, शांतीचा मार्ग दाखवितात, असे त्यांनी नमूद केले.
हैबतबाबांच्या दिंडीची मंदिरास प्रदक्षिणा –
मंदिराच्या महाद्वारात सुरुवातीला काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ-मृदंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी बाराच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. घंटानाद, अभिषेक आणि माउलींच्या समाधीवर विविध फुलांची पुष्पवृष्टी झाल्यानंतर श्रींची आरती घेण्यात आली.
संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांमार्फत वीणामंडपातून कारंजा मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभाऱ्यात माउलींच्या समाधीपुढे विराजमान करण्यात आल्या. त्यानंतर माउलींना महानैवेद्य देऊन नामदेवरायांचे वंशजांच्या परिवारासह, मानकरी, प्रमुख मान्यवरांना नारळ-प्रसाद संस्थानच्या वतीने देण्यात आला.