सातारा – सातारा चिकन सेंटर या दुकानाच्या पत्र्यांचे अतिक्रमण काढल्यावर दुकान मालकाने न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळवल्याने पालिकेला सोमवारी कारवाई गुंडाळावी लागली. सलग दुसऱ्या खेपेला अतिक्रमण हटाव विभागाला प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे माघारी फिरावी लागले.
दबावाच्या राजकारणामुळे शहर विकास विभागाचे पुरते हसे झाले आहे. पोवई नाका ते राधिका रोड यांना जोडणाऱ्या साठ फुटी रस्त्याचा डीपी मंजूर असताना त्यामध्ये सातारा चिकन सेंटर या दुकानाचे मोठे पक्क्या बांधकामाचे अतिक्रमण आहे.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची अतिक्रमण हटवण्याची स्पष्ट सूचना असताना पालिका प्रशासनाने राजकीय दबावापुढे मान तुकवत वेळकाढूपणा केला.
दुकान मालक चांद गणी आतार यांनी अतिक्रमण स्वतःहून काढण्यासाठी सोमवारची वेळ मागून घेतली होती. मात्र, त्यांनी मुदतीत हालचाल न केल्याने अतिक्रमणविरोधी विभागाचे निरीक्षक प्रशांत निकम यांनी आपल्या यंत्रणेसह सकाळी साडेअकरा वाजता कारवाईला सुरुवात केली.
दुकानाच्या पिछाडीकडून पथकाने तब्बल 29 पत्रे हटवून चेनलिंकची जाळी तोडली. दरम्यान, भाग निरीक्षकांनी आतार यांनी कोर्टाची स्टे ऑर्डर घेतल्याचा निरोप दिल्याने अतिक्रमण विभागाच्या मेहनतीवर पाणी फिरले.
मुख्याधिकाऱ्यांची बंदूक अभियंत्याच्या खांद्यावर
तब्बल चौदा महिन्यांच्या कागदी घोड्यांनंतर मोठे अतिक्रमण हटवून प्रस्तावित रस्ता मोकळा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होते. मात्र, कोर्टच्या स्टे ऑर्डरकडे बोट दाखवणाऱ्या पालिका प्रशासनाने राजकीय दबावामुळे बोटचेपेपणा केला. मुख्याधिकाऱ्यांनीही मुख्य अभियंता भाऊसाहेव पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली. तिथेच कारवाईचे कडबोळे झाले. आतार याने कोर्टकचेऱ्या करून कारवाई थांबवल्याने प्रशासनाला गप्प बसावे लागले.