पुणे – शहरात सार्वजनिक उत्सव काळात स्पीकर तसेच डीजे साउंडचे आवाज मान्य पातळीपेक्षा अधिक असू नयेत, यासाठी कठोर नियमावली असावी. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे दाद मागण्यात आली आहे.
या वर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत राज्यभरात साउंड सिस्टीमच्या आवाजावर कोणतही बंधन नव्हते. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात लेझर लाइटच्या वापरामुळे अनेकांना डोळ्यांच्या समस्यांसह, इतर समस्यांचा सामना करावा लागला आहे. ही बाब लक्षात घेता तातडीने याबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाची सर्वोच्च पातळी गाठली गेली. याचे दुष्परिणाम जीवघेणे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
सार्वजनिक उत्सवात साउंड सिस्टिमच्या आवाजावर आणि लेझर लाइटच्या वापरावर निर्बंध आणावेत. उल्लंघन झाल्यास कारवाईचे आदेश पोलिसांना द्यावेत. नवरात्रीपासूनच त्याची अंमलबजावणी करावी. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांनाही हे निर्बंध असावेत. – संदीप खर्डेकर, प्रवक्ते, भाजप