विविधा: अप्पासाहेब लंके

माधव विद्वांस
पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाचे संपादक, डॉ. बाबा आढाव यांचे सहकारी, हमाल पंचायतीचे आधारस्तंभ कृ. रा. तथा अप्पासाहेब लंके यांचे आज पुण्यस्मरण.त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1926 रोजी शेडगाव जिल्हा नगर येथे झाला. त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले होते. पदव्युत्तर शिक्षणानंतर ते पुणे महानगरपालिकेत रुजू झाले. कामगार संघटनेच्या माध्यमातून ते डॉ. बाबा आढाव व इतर समाजवादी चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांबरोबर जोडले गेले. ते त्यांच्या मित्रमंडळात अप्पा या नावाने ओळखले जायचे. अप्पांसारखी माणसे प्रसिद्धीचा हव्यास न करता सेवाभावी वृत्तीने आपले सामाजिक कार्य करीत असतात.

“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ याप्रमाणे कोणतीही अपेक्षा न ठेवता निरलसपणे त्यांनी आपले आयुष्य व्यतीत केले. समाजवादी चळवळीतील मंडळी त्यागाच्या भावनेतूनच येत असत त्याला अप्पाही अपवाद नव्हते. ते पुणे महानगरपालिकेच्या जकात अधीक्षक या मोठ्या मोहमयी पदावरून निवृत्त झाले; पण धुतल्या तांदळासारखे त्यांचे नोकरीतील आयुष्य होते. निवृत्तीनंतर ते महात्मा फुले प्रतिष्ठानमध्ये दाखल झाले.त्यानंतर 20 वर्षे ते प्रतिष्ठान हेच घर समजून कार्यरत राहिले. पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाच्या संपादनात त्यांचे मोठे योगदान होते.

ते या त्रैमासिकात सातत्याने लेखन करीत असत. महात्मा फुले प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. डॉ. बाबा आढाव सतत दौऱ्यावर असत त्यावेळी ते बाबांच्या संघटनांचे कार्य संभाळीत असत. बाबा आढावांच्या कामगारांच्या अनेक संघटना होत्या. त्यांच्या आर्थिक मदतीसाठी पतसंस्थाही होत्या. या सर्व संस्थांमध्ये त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहभाग असायचा. सभेमध्ये ते फक्‍त श्रोता असायचे वक्‍ता कधीच झाले नाहीत. मितभाषी फक्‍त मुद्द्याला धरून माफक बोलणे हा त्यांचा स्वभाव होता. हमाल पंचायत, कागद कामगार, काच कामगार, पत्रा कामगार अशा वेगवेगळ्या कामगारांच्या अनेक संघटना डॉ. आढाव यांचे नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. या सर्व संघटनांचे पतसंस्थांचे ते खजिनदार होते यावरून त्यांच्या कार्यकुशलतेची कल्पना येईल.

याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते क्रियाशील कार्यकर्ते होते. तसेच बुद्धिप्रामाण्यवादी मंच, लोक स्वतंत्रता संघटना, या सामाजिक चळवळींचेही ही त्यांचा संबंध होता. सामाजिक चळवळीत भाग घेणाऱ्याचे कुटुंबातील विशेषतः पत्नीची मोलाची साथ असते तशी साथ त्यांच्या पत्नी सिंधुताई यांनी त्यांना दिली त्यामुळे समाजसेवेचे पवित्र कार्य ते करू शकले.

आयुष्याचे अखेरपर्यंत हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्यांनी संत प्रतिष्ठानचा व कामगार चळवळीच्या सेवेचा घेतलेला वसा त्यांनी सोडला नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांचे इच्छेप्रमाणे त्यांच्यावर धार्मिक संस्कार करण्यात आले नाहीत तसेच त्यांनी मरणोत्तर नेत्रदानही केले. 24 ऑक्‍टोबर 2002 रोजी 76व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी समता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, डॉ. बाबा आढाव, भाई वैद्य, निळू फुले, नरेन्द्र दाभोलकर इत्यादी समाजवादी विचारसरणीची नेतेमंडळी उपस्थित होती. अभिवादन.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)