आठ उमेदवार विजयी : सहकार पॅनलला चार जागा
पारगाव – संपूर्ण दौड तालुक्याचे लक्ष लागलेल्या पारगाव सोसायटीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला आहे. तुकाईदेवी जनसेवा पॅनलचे आठ विजयी उमेदवार विजयी झाले तर तुकाईदेवी सहकारी पॅनलला चार जागांवरच समाधान मानावे लागले. अपक्ष उमेदवार मार्केट कमिटीचे संचालक संभाजी ताकवणे यांनी दोन्ही गटांवर मात करीत विजय खेचून आणला आहे. यावेळी विजयी पॅनलने निकालानंतर जल्लोष केला.
पारगाव सोसायटीची निवडणूक जाहीर झाल्यापासून चुरस निर्माण झाली होती. यात स्थानिक पातळीवर गट- तट बाजूला ठेवत पॅनल तयार केले होते. भाजपच्या एका गटाने तुकाईदेवी जनसेवा पॅनल उभा केले तर राष्ट्रवादी आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी एकत्रित येत तुकाईदेवी सहकारी पॅनल उभा केले. अपक्ष उमेदवार संभाजी ताकवणे यांनी अपक्ष उमेदवार ताकवणे यांनी आखाड्यात उडी घेतली. त्यामुळे ही निवडणूक तालुक्यात लक्षवेधी ठरली होती. याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
चुरशीच्या मतदानात भाजपने राष्ट्रवादीवर मात करीत सरशी केली.तुकाईदेवी जनसेवा पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- ज्ञानदेव ताकवणे, सर्जेराव जेधे, तुकाराम ताकवणे, मच्छिंद्र ताकवणे, अंकुश शिंदे, चंद्रकांत शिशुपाल, लता ताकवणे, चैताली काळे. पॅनलचे नेतृत्व भाजपाचे दौड तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, माजी सरपंच अरुण बोत्रे, माजी सरपंच सर्जेराव जेधे, राजाभाऊ तांबे, लक्ष्मण ताकवणे यांनी केले.
तुकाईदेवी सहकारी पॅनलचे चार उमेदवार- सयाजी ताकवणे, नामदेव ताकवणे, निलेश ताकवणे, महादेव डोमळे हे निवडून आले. या पॅनलचे नेतृत्व दौड पंचायत समितीचे माजी सभापती सयाजी ताकवणे, भाजपाचे पुणे जिल्हा माजी अध्यक्ष नामदेव ताकवणे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते पोपटराव ताकवणे यांनी केले. अपक्ष उमेदवार मार्केट कमिटीचे संचालक संभाजी ताकवणे हे विजयी झाले आहेत. सोसायटीच्या 105 वर्षांच्या इतिहासात अपक्ष म्हणून ताकवणे हे प्रथमच निवडून आले आहेत. याची चर्चा निकालानंतर रंगली होती.
तर इतर मागास प्रवर्गामधून निवडून आलेले अंकुश शिंदे हे उच्चांकी मतांनी निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक हर्षद तावरे यांनी काम पाहिले. माऊली ताकवणे म्हणाले की, पारदर्शक कारभार करून सभासदांसाठी बहुपयोगी योजना राबवून, संस्थेचा नाव लौकिक करणार आहे, यासाठी प्रयत्न करणार आहोत.