रवींद्र मिर्लेकर ः चाळकवाडी येथे भेट घेत चर्चा
बेल्हे – बिबट सफारी जुन्नर तालुक्यात होण्यासाठी माजी आमदार शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रवींद मिर्लेकर यांनी चाळकवाडी (ता. जुन्नर) या ठिकाणी केले.
जुन्नर तालुक्यात बिबट सफारी व्हावी, या मागणीसाठी जुन्नरचे माजी आमदार शिवसेना शरद सोनवणे यांनी जुन्नर येथे उपोषण केले. या उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालाविल्यानंतर त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे दाखल करण्यात आले होते. हे समजताच आज त्यांना भेटण्यासाठी आणि बिबट सफारी बाबत चर्चा करण्यासाठी रवींद्र मिर्लेकर यांनी सोनवणे यांच्या रायगड या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मिर्लेकर म्हणाले, जुन्नर तालुक्यात खोडद येथे जीएमआरटी आहे. त्यामुळे या ठिकाणी औद्योगिक वसाहत होऊ शकत नाही. तालुक्यात बिबट्यांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी बिबट सफारी व्हावी ही संकल्पना शरद सोनवणे यांनी मांडली; परंतु त्याचा पाठपुरावा योग्य मार्गाने होत नसल्यामुळे जनतेच्या मागणीसाठी आणि जुन्नरच्या पर्यटनाच्या दृष्टीने प्रकल्पास चालना देण्यासाठी माजी आमदार सोनवणे यांनी स्वपक्षाचे सरकार असतानाही आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये जागरुता निर्माण झाली.
शरद सोनवणे म्हणाले, बिबट सफारी हा जुन्नरच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि जुन्नरच्या अस्मितेसाठी आपण संघर्ष करत राहणार. यावेळी सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत तसेच रवींद मिर्लेकर यांचे आभार मानले. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश काकडे, युवा नेते गणेश कवडे, जुन्नर तालुका संपर्क प्रमुख दिलीप बाम्हणे उपस्थित होते.