पुणे -पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज दूध डेअरी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. जिल्हा बॅंकेपाठोपाठ जिल्हा दूध संघावर वर्चस्व ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ताकद लावाली लागणार आहे. दरम्यान, जिल्हा बॅंकेत चंचुप्रवेश केल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतही भाजप ताकदीने उतरण्याची शक्यता आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून (दि.14) उमेदवारी अर्ज भरणाची प्रक्रिया सुरु होणार आहे. तर मतदान 20 मार्चला तर मतमोजणी दि.21 मार्चला होणार आहे.
दूध संघाची निवडणुक 2020 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र राज्य शासनाने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत सहकार विभागातले अधिकारी व्यस्त असल्याचे कारण देत बॅंकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या.
यानंतर मार्चमध्ये आलेले करोनाचे संकट यामुळे या निवडणुका आणखी लांबणीवर गेल्या. आता करोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले त्यानुसार जिल्हा दूध संघाची निवडणुका घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. जिल्हा दूध संघासाठी 16 संचालक पदासाठी निवडणुक होत आहे. यामध्ये एकूण मतदार 709 आहेत.