सातारा – तब्बल शंभर वर्षे वयाच्या; परंतु मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसर येथील वटवृक्षाला साताऱ्यात पुनर्रोपणाने जीवदान देण्यात आले आहे. मराठी, हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या “सह्याद्री देवराई’ या संस्थेला साताऱ्यात देवराई निर्माण करण्यासाठी म्हसवे (डी मार्टजवळ) येथे पोलीस गोळीबार
मैदानाची काही जागा देण्यात आली आहे. वृक्षांचे मानवतेशी, श्वासाशी असलेले नाते चिरंतन राहावे म्हणून, या वटवृक्षासोबत अनोख्या पद्धतीने “व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यात येणार आहे. उद्या, दि. 14 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
सयाजी शिंदे म्हणाले, अडचण होत आहे, असे समजून आपला राष्ट्रीय वृक्ष असलेला वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्षे वयाचा हा वटवृक्ष ताब्यात घेतला. मोठ्या ट्रकमधून साताऱ्यात गोळीबार मैदानात (म्हसवे) आणून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण केले. या वटवृक्षाला जीवदान मिळून पालवी फुटली आहे.
“व्हॅलेंटाईन डे’ला वृक्षप्रेमी नागरिक, विद्यार्थी या पालवी फुटलेल्या वटवृक्षाभोवती जमून, त्याचे कोडकौतुक करणार आहोत. या शंभर वर्षांच्या झाडाचे पुनरुज्जीवन करायला फक्त 25 हजार रुपये खर्च आला. अडचण होते, म्हणून असे वृक्ष कापून टाकून देता कामा नये. वड हा तर राष्ट्रीय वृक्ष असून, त्याचे सन्मानाने 26 जानेवारीला म्हसवे येथे पुनर्रोपण करण्यात आले. निवडणुकीत जिंकलेल्या उमेदवारची आपण मिरवणूक काढतो. येथे तर शंभर वर्षांचा राष्ट्रीय वृक्ष वाचवण्यात यश आले आहे.
“सह्याद्री देवराई’ विषयी
सयाजी शिंदे यांच्या “सह्याद्री देवराई’ संस्थेने संपूर्ण राज्यभरात वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे. आतापर्यंत साधारण 22 देवराई, एक वृक्ष बॅंक, 14 गडकिल्ले व राज्यात अन्य ठिकाणी चार लाखांपेक्षा अधिक वृक्षांचे रोपण केले आहे. त्यांच्या संकल्पनेतून साताऱ्यातही दुर्मीळ झाडांचे उद्यान तयार केले जात आहे. या उद्यानात मेहनत घेताना ते अनेकदा दिसतात.
सह्याद्री पर्वतरांगांमधील पश्चिम घाटातील दुर्मीळ वनस्पती, वृक्ष आणि देशातील इतर राज्यांमधील 600 हून अधिक दुर्मीळ वृक्षांच्या प्रजाती एकाच ठिकाणी लावण्याचा अनोखा प्रयोग साताऱ्यात सुरू आहे. या उपक्रमासाठी पुणे-बंगळुरू महामार्गालगत म्हसवे गावाच्या बाजूला 30 एकर जागेतील पोलीस गोळीबार मैदानात जागा दण्यात आली आहे. तेथे सह्याद्री देवराई, जिल्हा पोलीस दल आणि वन विभागाच्यावतीने हे उद्यान उभारण्यात येत आहे.