नगर (प्रतिनिधी) – जिल्हा बँक निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी होणार असल्याचे पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या हालचालींवरून दिसून आले. मंगळवारी जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी 23 इच्छुकांनी 153 उमेदवारी अर्ज नेले असून, सबाजी गायकवाड यांचा बिगरशेती मतदारसंघातून उमदेवारी अर्ज दाखल झाला आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी येत्या 20 फेबु्रवारीला मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. काल पहिल्या दिवशी 153 उमेदवारी अर्ज विकत नेण्यात आले आहेत. उमेदवारी अर्जासाठी 100 शुल्क असून, सोबत अंतिम मतदार यासाठी 500 शुल्क ठेवण्यात आलेले आहे.
यासह उमेदवारी अर्ज दाखल करताना अनुसूचित जाती-जमाती वगळता सर्व उमेदवारांना 2 हजार रुपये उमेदवारी अनामत रक्कम ठेवण्यात आली असून, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 500 रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आलेली आहे.
पहिला अर्ज शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासाठी त्र्यंबक अकोलकर यांनी नेला आहे. यासह प्रशांत सबाजी गायकवाड (पारनेर), सुरेश करपे विकास सोसायटी मतदारसंघ (राहुरी), अमोल जगनाथ राळेभात विकास सोसायटी मतदारसंघ (जामखेड), तान्हाजी धसाळ विकास सोसायटी मतदरासंघ (राहुरी), गणेश मुदगले शेती पूरक मतदारसंघ (श्रीरामपूर), संजय निमसे विकास सोसायटी मतदारसंघ (नगर) यांनी उमदेवारी अर्ज नेलेले आहेत. येत्या 25 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत आहे.