मंदिर निधी संकलनावेळी गुजरातेत हिंसाचार; 1 ठार, अनेकजण जखमी

पोलिसांनी चाळीस जणांना केली अटक

अहमदाबाद – गुजरात मधील कच्छ जिल्ह्यात अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन कार्यक्रमासाठी रविवारी एक मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी दोन गटात झालेल्या हिंसाचारात एक जण ठार तर अन्य अनेक जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तीन गुन्हे दाखल करून चाळीस जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि दंगल भडकावण्यासारखे गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी सांगितले की विश्‍व हिंदु परिषदेच्यावतीने ही रॅली काढण्यात आली होती. त्यात प्रक्षोभक घोषणा देण्यात आल्याने दुसरा गट हिंसक बनला आणि त्यांनी या रॅलीवर हल्ला केला त्यातून दोन गटांमध्ये जोरदार चकमक झाली.

दोन्ही गटांकडून एकमेकावर लोखंडी रॉड, आणि तलवारीने हल्ले करण्यात आल्याचेही सांगण्यात येते. दोन्ही गटातील लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. कच्छ जिल्ह्यातील किदान गावात हा प्रकार घडला.

या प्रकारात जो इसम ठार झाला आहे तो झारखंडचा स्थलांतरीत मजुर असल्याचे निष्पन्न झाले आहे. निधी संकलनासाठी ही रॅली काढण्यासाठी संबंधीतांना पोलिसांची अनुमती घेतली नव्हती असे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.