नगर – नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अवघ्या चार जागांसाठी येत्या 20 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यासाठी आज चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विशेष म्हणजे भाजप नेते व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले महसूलमंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनेलचे उमेदवार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
सहमतीच्या राजकारणातून काल जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 17 संचालक बिनविरोध झाले. उर्वरित चार जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात महसूलमंत्री थोरात यांच्या विरोधात विखे पाटील गटाचा पॅनेल सामना करत आहे. नगर, कर्जत व पारनेर सेवा सोसायटीसह बिगरशेती मतदारसंघात ही निवडणूक होत आहे.
सेवा सोसायटी मतदारसंघात नगरमधून कर्डिले, कर्जतमधून मीनाक्षी साळुंके व पारनेरमधून उदय शेळके महाविकास आघाडीच्या पॅनेलचे उमेदवार असून, त्यांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. विखे गटाचे सेवा सोसायटी मतदारसंघात कर्जतमधून अंबादास पिसाळ, पारनेरमधून रामदास भोसले उमेदवार आहेत. त्यांना विमान चिन्ह मिळाले आहे.
नगरमधील सेवा सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेल्या सत्यभामाबाई बेरड यांना छत्री चिन्ह मिळाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर काम पाहत आहेत.